हरणार नाय, लढणार, ४५०० झाडांचे करू रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 22:27 IST2019-05-17T22:27:12+5:302019-05-17T22:27:24+5:30
स्थानिक हनुमान टेकडी भागातील आॅक्सिजन पार्क परिसरात रविवारी पुन्हा अचानक आग लागली. यात सहा फूट उंचीची सुमोर १०० झाडे जळून कोळसा झाली. इतकेच नव्हे तर रोपट्यांना पाणी देण्यासाठी परिसरात असलेले ड्रीप संच व इतर साहित्य जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

हरणार नाय, लढणार, ४५०० झाडांचे करू रोपण
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक हनुमान टेकडी भागातील आॅक्सिजन पार्क परिसरात रविवारी पुन्हा अचानक आग लागली. यात सहा फूट उंचीची सुमोर १०० झाडे जळून कोळसा झाली. इतकेच नव्हे तर रोपट्यांना पाणी देण्यासाठी परिसरात असलेले ड्रीप संच व इतर साहित्य जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विकृतांनी घडविलेल्या आगीच्या या तिसऱ्या घटनेनंतर ‘माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरू‘ असे म्हणत वैद्यकीय जनजागृती मंचासह संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नव्या दमाने साडेचार हजार वृक्षरोपांची लागवड करून जिंकू आणि जिंकूच, असा संकल्प केला आहे. जळालेल्या झाडांना स्प्रिंकलरद्वारे पाणी देत नवसंजीवनी दिली जात आहे.
ओसाड हनुमान टेकडी परिसरात विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाºयांनी आणि वर्धा शहरातील काही सुजाण नागरिकांनी एकत्र येत श्रमदान करून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले. पदाधिकाऱ्यांनी एवढ्यावरच थांबून न जाता त्या रोपट्यांचे संगोपनही केले. यामुळे हनुमान टेकडी परिसराला आॅक्सिजन पार्क अशीच नवी ओळख मिळाली. याच आॅक्सिजन पार्क परिसरात कित्येक जण सकाळी फिरायला येतात. रविवारी रात्री उशीरा अचानक याच परिसरात आग लागली. परिसरातील नागरिकांनी वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांना माहिती दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठत घटनेची माहिती इतर सामाजिक संघटनांच्या पदाधिकाºयांना दिली. दरम्यान, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. मात्र, मोठ्या प्रमाणात वृक्ष आगीच्या भक्षस्थानी पडले होते. एक-दीड महिन्यांच्या कालावधीत विकृत मानसिकतेने टेकडीला तीनवेळा ‘टार्गेट’ केले. या घटनांना प्रत्युत्तर म्हणून वैद्यकीय जनजागृती मंचासह विविध संघटनांनी तुम्ही निरागस, कोवळ्या ४५० झाडांची होळी केली तर नव्याने ४५०० वृक्षरोपांची मियावाकी प्रकल्प राबवून लागवड करण्याचा निर्धार केला आहे. जळित झाडांना स्प्रिंकलरद्वारे पाणी दिले जात आहे. झाडे जाळण्याचे कार्य करणाऱ्यांनो, सावध व्हा, कारण प्रत्येक निसर्गमित्र आमच्या पाठीशी ठामपणे उभा असून नव्याने वृक्षलागवडीसाठी सज्ज आहे आणि हे कार्य कधीच थांबणार नसल्याचेही वैद्यकीय जनजागृती मंचने म्हटले आहे.