विजय नाडे हत्या प्रकरण : त्रासाला कंटाळून टाकला डोक्यावर दगडवर्धा : येथील अशोकनगर परिसरात झालेल्या विजय नाडे याची हत्या त्याच्या पत्नीनेच केल्याचा खुलासा झाला आहे. त्याच्याकडून होत असलेल्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून तिने विजयच्या डोक्यात दगड टाकून हत्या केल्याची कबुली दिली. यावरून विजयची पत्नी शकीला विजय नाडे (४५) रा. अशोकनगर हिला शहर पोलिसांनी अटक केली. रविवारी (७ डिसेंबर) मध्यरात्री अशोकनगर येथील विजय नाडे नामक इसमाची हत्या करण्यात आली होती. यावेळी घरी त्याची पत्नी शकीला एकटीच होती. त्याची हत्या होताच विजयला मारले असे म्हणत ती घराबाहेर पडली. यावेळी परिसरातील नागरिकांनी घरात जावून पाहिले असता विजय रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसले. याच वेळी विजयची पत्नी शकीला हिने स्वत:ला जखमी करून आपली प्रकृती चिंताजनक असल्याचा बनाव निर्माण केला. तिची प्रकृती अत्यवस्थ असल्याने पोलिसांनी तिला सेवाग्राम येथे दाखल केले; मात्र तिने आपल्याला आराम नसल्याचे म्हटल्याने तिला नागपूर येथे हलविण्यात आले. विजयी हत्या झाली त्यावेळी केवळ त्याची पत्नी घरात असल्याने तिच्या बयानावर सर्वच अवलंबून होते. यामुळे पोलीस तिची प्रकृती ठिक होण्याच्या प्रतीक्षेत होते. या दरम्यान तिचे दोन वेळा बयाण नोंदविण्यात आले असता त्यात तफावत असल्याचे निदर्शनास आले. शिवाय शकीलाने दिलेल्या बयानानुसार तिच्या घरातून कुणीही बाहेर पडल्याचे परिसरातील नागरिकांनीही पाहिले नाही. यामुळे पोलिसांचा संशय शकीलाकडे वळला. तिची प्रकृती ठिक होताच शहर ठाण्याचे निरीक्षक एम. बुराडे यांनी शकीला हिला ताब्यात घेत पोलीसी हिसका दाखविला असता तिने हत्येची कबुली दिली. यावरून तिच्यावर विजयच्या हत्येप्रकरणी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
पत्नीच निघाली मारेकरी
By admin | Updated: December 13, 2014 22:43 IST