हिंदी विश्वविद्यापीठातून विद्यार्थी का होत आहेत 'ड्रॉप आऊट' ? सहा वर्षांत ५०० विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 16:08 IST2025-11-20T16:06:19+5:302025-11-20T16:08:10+5:30
Wardha : हिंदी भाषेचा प्रसार, प्रचार करण्यासाठी एकमेव केंद्रीय विद्यापीठ महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यापीठ या नावाने स्थापना करण्यात आले.

Why are students dropping out of Hindi universities? 500 students dropped out in six years
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठात देश-विदेशातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. या विद्यापीठातून विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळत असल्याने विद्यार्थ्यांची पावले इकडे वळायला लागली होती. परंतु सन २०१९ ते २०२४ या सहा वर्षाच्या कालावधीत तब्बल ५५० विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सत्राच्या मध्येच शिक्षण सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हिंदी भाषेचा प्रसार, प्रचार करण्यासाठी एकमेव केंद्रीय विद्यापीठ महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यापीठ या नावाने स्थापना करण्यात आले. या विद्यापीठामध्ये हिंदी माध्यमातून साहित्य, भाषा, अनुवाद, फिल्म, नाटक, जनसंवाद, सोशल वर्क यासह अनेक शाखेचे शिक्षण दिले जाते. तसेच इतर देशांतील विद्यार्थ्यांना हिंदी शिकवली जाते. है केंद्रीय विद्यापीठ असल्याने व शैक्षणिक खर्च कमी येत असल्यामुळे या विद्यापीठात देशातील विविध राज्यांतील विद्यार्थी येथे प्रवेश घेतात. मात्र गेल्या सहा वर्षांमध्ये ५५० विद्यार्थ्यांनी या विद्यापीठातून 'ड्रॉप आऊट' केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ही आकडेवारी माहिती अधिकारातून समोर आली असून, केंद्रातील एकमेव विद्यापीठ असतानाही ही स्थिती का ओढवली, हाच आता संशोधनाचा विषय ठरत आहे.
'ड्रॉप आऊट' घेण्याचे कारण काय ?
केंद्रीय विद्यापीठातून शिक्षण घेण्याचे प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. त्याअनुषंगाने देशातील अनेक विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना वेटिंग राहावे लागते. मात्र, गत काही वर्षांपासून हिंदी विश्वविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी निरुत्साही दिसून येत आहेत. इतकेच नाही तर ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, त्यांनीही शिक्षण मध्येच सोडले आहे. काही दिवसांपासून हे विद्यापीठ विविध कारणांमुळे तसेच अंतर्गत वादांमुळे चर्चेत राहिले आहे. यातूनच तर विद्याथ्यांनी काढता पाय घेतला नसावा ना, की विद्यापीठ सुविधा देण्यास कमी पडत आहे, असे अनेक प्रश्न आता उपस्थित व्हायला लागले आहेत.
तीन वर्षापासून पीएच.डी.चे प्रवेश झालेच नाहीत
हिंदी भाषेत वेगवेगळ्या विषयात संशोधन व्हावे व हे संशोधन समाजाच्या उपयोगी ठरावे, यासाठी केंद्र सरकार कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. मात्र, या हिंदी विद्यापीठात शैक्षणिक सत्र २०२२ पासून आजपर्यंत एकही पीएच. डी. प्रवेश झालाच नाही. नवे संशोधन कसे होणार, असा प्रश्न विद्यार्थ्यांतून उपस्थित होत आहे.
स्पॉट प्रवेश देऊनही विभाग खालीच केंद्र सरकारद्वारा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट आयोजित केली जाते. ही परीक्षा पास झालेले विद्यार्थी आपल्या आवडीनुसार विद्यापीठात प्रवेश घेतात. अशातच हिंदी विद्यापीठात सुद्धा यावर्षी काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. मात्र, प्रवेश घेऊन सुद्धा काही विभागासाठी स्पॉट प्रवेश देण्यात आले होते. तरीही विद्यापीठातील काही विभागात विद्यार्थी बोटावर मोजण्याइतकेच आहेत.
'एनटीए द्वारा आयोजित कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट (सीयूईटी) अंतर्गत परीक्षा आयोजित केली जाते. परीक्षेचा निकाल लागल्यावर एका महिन्याच्या आत अॅडमिशन केली जाते. याचदरम्यान आपल्या आवडीनुसार विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यामुळे हा ड्रॉप आऊट होऊ शकतो. ही समस्या याच विद्यापीठाची नाही तर देशातल्या इतरही विद्यापीठांची आहे.
- कादर नवाज खान, कुलसचिव, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा