सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:55 PM2018-02-23T23:55:13+5:302018-02-23T23:55:13+5:30

सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाकरिता जिल्ह्यातील ५०० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. या निवडीला वर्षाचा कालावधी झाला असला तरी एकाही गावांत ही योजना अद्याप कार्यान्वीत झाली नाही.

Wastewater and solid waste management | सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन रखडले

सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन रखडले

googlenewsNext
ठळक मुद्दे५०० ग्रा.पं.तील समस्या कायमच : लोकसंख्येनुसार अनुदान

रूपेश खैरी।
ऑनलाईन लोकमत
वर्धा : सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाकरिता जिल्ह्यातील ५०० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती. या निवडीला वर्षाचा कालावधी झाला असला तरी एकाही गावांत ही योजना अद्याप कार्यान्वीत झाली नाही. परिणामी प्रत्येक गावांत रस्त्याने वाहणारे सांडपाणी आजही वाहतच असून रस्त्याच्या कडेला असलेले कचऱ्याचे ढिग कायम आहेत.
ग्रामीण भागात सांडपाण्याची समस्या बिकट रूप धरून आहे. ग्रामीण भागात घराघरातून निघणारे सांडपाणी रस्त्याच्या कडेने वाहत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. या पाण्याचे व्यवस्थापन करण्याकरिता स्वच्छता विभागामार्फत नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या. या सांडपाण्यासह गावातील घनकचरा व्यवस्थापनही करण्यात येणार होते. याकरिता जिल्हा परिषदेमार्फत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करण्याबाबत प्रकल्प राबविण्याचा निर्णय झाला. त्याला मंजुरीही मिळाली. ग्रामपंचायती या प्रकल्पाच्या मंजुरीकरिता प्राकलन तयार करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. या सुचनेनुसार स्वच्छता विभागाच्यावतीने २२६ प्राकलन तयार करण्यात आले. तर २७५ ग्रामपंचायतीचे प्राकलन तयार करण सुरू आहे. सादर केलेल्या प्राकलनापैकी केवळ ७८ गावांच्या प्राकलनालाच मान्यता देण्यात आली आहे. मान्यता मिळाली तरी प्रत्यक्षात अद्याप काम सुरू करण्यात आले नाही. यामुळे गावांतील स्थिती अद्याप तशीच आहे. याकरिता निवड झालेल्या ग्रामपंचायतीला असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानातून सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्याच्या सूचना आहे.
सांडपाण्याची व्यवस्था करताना या निधीतून नाली बांधकाम करण्यावर बंदी आहे. तर गावाच्या बाहेर येणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेती वा इतर कामांकरिता वापर करण्याच्या सूचना शासनामार्फत करण्यात आल्या आहेत. नागरिकांचे आरोग्य आणि गावाच्या स्वच्छतेकरिता महत्त्वाच्या असलेल्या प्रकल्पाला जिल्हा परिषद प्रशासनाकडून अद्याप मुहूर्त करण्यात आला नाही. यामुळे स्वच्छ गावाच्या संकल्पनेला ब्रेक बसला आहे. याचा विचार होण्याची गरज आहे.
ग्रामपंचायतींना मिळणारे अनुदान
या प्रकल्पाकरिता ग्रामपंचायतींना अनुदान देण्यात येत आहे. मिळणारे अनुदान गावाच्या लोकसंख्येवर आधारीत आहे. १५० कुटुंब असलेल्या गावांना ७ लाख रुपये मिळणार आहे. एवढी कुटुंब असलेली जिल्ह्यात २८ गावे आहेत. १५० ते ३०० कुटुंब असलेली जिल्ह्यात २२७ गावे असून अशा गावांना १२ लाख रुपये मिळणार आहे. ३०० ते ५०० कुटुंब असलेली १६१ गावे असून त्यांना १५ लाख रुपये मिळणार आहे. ५०० च्यावर कुटुंब असलेली ७५ गावे असून त्यांना २० लाख रुपये मिळणार आहे. यातून सांडपाणी आणि घनकचºयाचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे.
२७ ग्रामपंचायतीच्या प्रकल्पांना मान्यता
सादर करण्यात आलेल्या प्राकलनापैकी ७८ प्राकलनाला तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे. तांत्रिक मंजुरी देण्याची जबाबदारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे आहे. यातील २७ गावांत हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती स्वच्छता विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. मात्र या निविदा केव्हा निघतील याची माहिती अद्याप कुणाला नाही.
गावातील सांडपाणी रस्त्यावर
शासनाच्यावतीने सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन करण्याच्या सूचना असून अंमलबजावणी अद्याप नाही. यामुळे गावातील रस्त्यांवर सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचे दिसत आहे.

Web Title: Wastewater and solid waste management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.