वर्धेकरांनो सावधान; कोरोना नवा उच्चांक गाठण्याच्या तयारीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 05:00 IST2022-07-16T05:00:00+5:302022-07-16T05:00:16+5:30

सध्या नवीन कोविडबाधित सापडण्याची गती वाढल्याने नागरिकांनीही दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. कोविडच्या पहिल्या लाटेत उच्चांक गाठत असताना २५ सप्टेंबर २०२० रोजी जिल्ह्यात तब्बल २५८ नवीन कोविड बाधितांची नोंद घेण्यात आली. हा कोविडच्या पहिल्या लाटेचा वर्धा जिल्ह्यातील उच्चांक होता. तर कोरोनाची दुसरी लाट उच्चांक गाठत असताना २८ एप्रिल २०२१ रोजी तब्बल १ हजार ४२२ नव्या कोविड बाधितांची नोंद घेण्यात आली होती.

Wardhekars beware; Corona is preparing to reach a new high! | वर्धेकरांनो सावधान; कोरोना नवा उच्चांक गाठण्याच्या तयारीत!

वर्धेकरांनो सावधान; कोरोना नवा उच्चांक गाठण्याच्या तयारीत!

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून कोविडच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या लाटेचा वर्धेकरांनी मोठ्या धाडसानेच सामना केला. पण जिल्ह्यात सध्या सततचा पाऊस या आस्मानी संकटासोबतच कोविड संसर्ग पुन्हा एकदा नव्या जोमाने आपले पाय पसरू पाहत आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत एकूण ५४ सक्रिय कोविडबाधित असून यात सर्वाधिक पुरुषांचा समावेश आहे. सध्या नवीन कोविडबाधित सापडण्याची गती वाढल्याने नागरिकांनीही दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. कोविडच्या पहिल्या लाटेत उच्चांक गाठत असताना २५ सप्टेंबर २०२० रोजी जिल्ह्यात तब्बल २५८ नवीन कोविड बाधितांची नोंद घेण्यात आली. हा कोविडच्या पहिल्या लाटेचा वर्धा जिल्ह्यातील उच्चांक होता. तर कोरोनाची दुसरी लाट उच्चांक गाठत असताना २८ एप्रिल २०२१ रोजी तब्बल १ हजार ४२२ नव्या कोविड बाधितांची नोंद घेण्यात आली होती. तसेच २९ जानेवारी २०२२ या दिवशी जिल्ह्यात तब्बल ६९१ नवीन कोविड बाधितांची नोंद घेण्यात आल्याने अनुक्रमे हा कोविडच्या दुसऱ्या व तिसऱ्या लाटेचा उच्चांकच ठरला. तर सध्या कोविडची चौथी लाट वर्धा जिल्ह्यात उच्चांक गाठण्याचा प्रयत्न करीत असून, नागरिकांनीही जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आरोग्य विभागाच्यावतीने जाहीर केलेल्या त्रि-सूत्रींचे पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

यंदा कोविड मृत्यू रोखण्यात यंत्रणेला यश
-  जिल्ह्यात सध्या नवीन काेविडबाधित सापडण्याची गती चांगलीच वाढली असली तरी रुग्णांना हॉस्पिटलाइज करण्याचे प्रमाण अल्पच आहे. इतकेच नव्हे तर आतापर्यंत कोविड मृत्यू रोखण्यात आरोग्य विभागाला चांगले यश आले आहे. एकूणच जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात आलेल्या कोविड लसीकरण मोहिमेचा हा सकारात्मक परिणाम असल्याचे सांगण्यात आले.

प्रतिबंधात्मक लस प्रभावीच

- कुठलाही व्यक्ती कोविड लसीपासून वंचित राहू नये म्हणून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात ‘हर घर दस्तक’ कोविड लसीकरण मोहीम राबविली जात आहे. कोविड मृत्यू रोखण्यासाठी कोरोनाची प्रतिबंधात्मक लस ही उत्तम व प्रभावी उपाय असल्याचे सांगण्यात येत असून नागरिकांनीही नजीकच्या केंद्रावर जात कोविडची लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

Web Title: Wardhekars beware; Corona is preparing to reach a new high!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.