वर्धेकरांची अपेक्षापूर्ती नाहीच!

By Admin | Updated: July 8, 2014 23:35 IST2014-07-08T23:35:36+5:302014-07-08T23:35:36+5:30

रेल्वे अर्थसंकल्पात नेहमीच विदर्भाच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार घडतो. प्रत्येक अर्थसंकल्पात थातूरमातूर उपाययोजना केल्याने विदर्भाच्या पदरात निराशाच पडते. यंदाही विदर्भाला फारसे न देता खुप

Wardhaikarera not expecting! | वर्धेकरांची अपेक्षापूर्ती नाहीच!

वर्धेकरांची अपेक्षापूर्ती नाहीच!

रेल्वे अर्थसंकल्पात नेहमीच विदर्भाच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार घडतो. प्रत्येक अर्थसंकल्पात थातूरमातूर उपाययोजना केल्याने विदर्भाच्या पदरात निराशाच पडते. यंदाही विदर्भाला फारसे न देता खुप दिल्याचा आव रेल्वे अर्थसंकल्पातून दिसून आला़ नागपूर येथून विलासपूर व सिकंदराबाद या दोन वेगवान ट्रेन सुरू करण्यापलीकडे काहीही दिले नाही़ काजीपेठ ते मुंबई या गाडीची घोषणा झाली; पण तीही साप्ताहिक आहे़ काही चांगल्या निर्णयांचा अंतर्भाव करण्यात आला असला जिल्ह्यातील प्रस्ताव, मागण्या मात्र पूर्ण झाल्या नाहीत़ यापूर्वी मंजूर वर्धा-यवतमाळ -नांदेड या रेल्वेमार्गाबद्दल उल्लेख नाही तर आर्वी पुलगाव ऐतिहासिक शकुंतला ब्रॉडगेज करून नरखेडपर्यंत वाढविण्याच्या प्रस्तावालाही कुठेच थारा दिलेला नाही़ सामान्यांकरिता नागपूर, वर्धा, बडनेरा दरम्यान कुठलीही नवीन गाडी देण्यात आली नाही़
काय
होत्या अपेक्षा़़़
स्टॉपेजची मागणी अपूर्णच
नागपूर ते बडनेरा दरम्यान सिंदी (रेल्वे), पुलगाव, धामणगाव या मोठ्या रेल्वे स्थानकांवर काही एक्स्प्रेस गाड्यांच्या थांब्याची मागणी करण्यात आली होती़
शिवाय सेवाग्राम ते चंद्रपूरपर्यंतच्या हिंगणघाट, वरोरा येथेही सुपरफास्ट गाड्या थांबाव्या, अशी मागणी होती़
सामान्यांशी जुळलेल्या या मागण्यांकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले़ यापूर्वीच्या रेल्वे मंत्र्यांनीही याकडे लक्ष दिले नाही तर बजेटमध्येही यावर विचार करण्यात आलेला नाही़
यामुळे सामान्यांना कुठलाही लाभ नसल्याचे दिसते़
वर्धा-नांदेड, पुलगाव-आर्वी-नरखेड प्रकल्पही रखडलाच
यापूर्वीच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वे मार्ग मंजूर करण्यात आला होता़ यासाठी जमिनीचे अधिग्रहणही सुरू करण्यात आले होते; पण हा प्रकल्प अद्यापही पूर्णत्त्वास गेलेला नाही़ यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे़
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आश्वासित केल्यानंतर उपोषण मागे घेतलेल्या पुलगाव-आर्वी-नरखेड रेल्वे मार्गालाही अर्थसंकल्पात थारा देण्यात आलेला नाही़ ऐतिहासिक इंग्रजकालीन शकुंतला एक्स्प्रेस ब्रॉडगेज करून नरखेडपर्यंत वाढविण्याची मागणी शेवटी अपूर्णच राहिली आहे़ अर्थसंकल्पात यासाठी कुठलीही तरतूद करण्यात आली नाही़
वर्धेतील रेल्वे उड्डाण पूलाचा प्रश्नही खितपतच
यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये ११६४ नवीन रेल्वे पुलांचा अंतर्भाव करण्यात आला आहे़ रेल्वे क्रॉसिंग ही संकल्पना हद्दपार करण्याचा प्रयत्न यातून होत असला तरी वर्धेतील वा अन्य जिल्ह्यांतील वाहतुकीला अपूरे पडत असलेल्या रेल्वे उड्डाण पुलांच्या विस्तारीकरणावर कुठलीही तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही़
कित्येक वर्षांपासून रेल्वे प्रशासनाकडे धूळखात पडलेला पूल विस्तारीकरणाचा प्रश्न निकाली निघणे, हे वर्धेकरांसाठी महत्त्वाचे होते; पण याचाही अंतर्भाव करण्यात आलेला नाही़ यामुळे रेल्वेच्या यंदाच्या अर्थसंकल्पानेही वर्धेकरांना काहीच दिले नसल्याचेच दिसून येत आहे़
नवीन गाड्यांमध्ये जिल्ह्याला भोपळाच
नागपूर वा मुंबई येथून नवीन गाड्या सुरू करून जिल्ह्याला दिलासा देणे गरजेचे होते; पण कुठलीही नवीन गाडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही़
नागपूर ते पुणे व काजीपेठ ते मुंबई या दोन गाड्या सुरू करण्याची घोषणा झाली; पण त्या दोन्ही गाड्या साप्ताहिक ठेवण्यात आल्याने कुणाच्याही उपयोगाच्या नसल्याच्या प्रतिक्रीया उमटत आहेत़
वर्धा जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी एकही नवीन गाडी सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली नाही़
नागपूर ते भुसावळ दरम्यान पॅसेंजरही वाढविण्यात आल्या नाहीत़ यामुळे वर्धेकरांच्या अपेक्षांची पूर्ती करण्यात हा रेल्वे अर्थसंकल्प अपयशीच ठरलाय़

Web Title: Wardhaikarera not expecting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.