गाव पातळीवरील समित्यांचे काम कागदावरच
By Admin | Updated: September 20, 2014 23:59 IST2014-09-20T23:59:55+5:302014-09-20T23:59:55+5:30
गावांचा सर्वांगिण विकास व्हावा, ग्रा़पं़ पदाधिकारी व प्रशासनास लोकसहभागरूपी मदतीचा हात मिळावा म्हणून विविध ग्राम विकास समित्यांचे गठण केले जाते. ग्रामसभेतून निवड झाल्यानंतर

गाव पातळीवरील समित्यांचे काम कागदावरच
वायगाव (नि़) : गावांचा सर्वांगिण विकास व्हावा, ग्रा़पं़ पदाधिकारी व प्रशासनास लोकसहभागरूपी मदतीचा हात मिळावा म्हणून विविध ग्राम विकास समित्यांचे गठण केले जाते. ग्रामसभेतून निवड झाल्यानंतर या समित्या मात्र कागदाच्या बाहेर निघत नसून कागदोपत्री पूर्तता करणे याशिवाय समित्यांचे कार्य पूढे सरकत नसल्याचे दिसते़ यामुळे समिती स्थापण्याचा मूळ उद्देश लोप पावत असल्याचे दिसते़
गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी ग्रा़पं़ च्या मदतीला सुज्ञ नागरिकांची जोड असावी म्हणून ग्रामविकास समिती स्थापन करण्यात येते. गावात स्वच्छता राहावी म्हणून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता समिती स्थापन केली जाते. असे असले तरी अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसते़ पिण्याचे पाणी शुद्ध मिळावे म्हणून पाणीपुरवठा स्वच्छता समिती असली तरी अशुद्ध पाणी मिळते. वसुली व्हावी म्हणून जनजागृतीसाठी समितीची मदत ग्रा़पं़ ला होत नाही. वन संवर्धनासाठी वन व्यवस्थापन समिती, तंटे गावातच मिटावे म्हणून महात्मा गांधी तंटामुक्त समिती असते; पण समिती नेमतानाही तंटे होत असल्याचे अनेक ठिकाणी दिसते़ पुरस्कारासाठी तंटे मिटवत असले तरी वास्तव वेगळे आहे. जलसंवर्धन, मृदसंवर्धन, उपजीविकेची संसाधन निर्माण करण्यासाठी पाणलोट व्यवस्थापन समिती, मनरेगाच्या कामाचे मुल्यमापण करण्यासाठी लोकलेखा समिती, कृषी व उद्योग विकासासाठी केम समिती, शैक्षणिक विकासासाठी शाळा व्यवस्थापन समिती आदी समित्या आहे़ यावर्षी नव्याने जैविक विविधता व्यवस्थापन समिती ग्रामसभेतून नेमली़
अनेक समित्यांचे गठण गरजेनुसार केले जाते. सदर समितीत निवड होण्यासाठी सदस्याला त्या विषयाची प्राथमिक माहिती असणे किमान आवश्यक असते. त्याला त्या विषयाची आवड व काही कार्य करण्याची तयारी असावी. त्याला समस्येची जाण व महत्त्व कळले पाहिजे, तरच तो आपले काम उत्तमरित्या करू शकेल. समिती नेमताना सुज्ञ नागरिकांची निवड होण्याऐवजी मर्जीतील व्यक्तींची वर्णी लागण्यासाठी प्रयत्न होतात़ यामुळे अनेकदा गावातील राजकीय वातावरण तापते. समिती नेमण्याची कागदोपत्री पूर्तता झाल्यानंतर समितीचे कार्य तसेच राहते़ याचा परिणाम गावाच्या सर्वांगिण विकासावर होत असून आज अनेक गावे हागणदारीच्या विळख्यातून बाहेर पडली नाहीत़
समिती नेमण्याचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर प्रशासकीय स्तरावरून मदत मिळत नाही. त्याच्या कामकाजाचा आढावा घेतला जात नाही. यामुळे या ग्रामविकास समित्या स्थापन करून कोणते प्रश्न मार्गी लावले जातात, हा प्रश्नच आहे़(वार्ताहर)