Two members of Iranian gang arrested for robbery | जबरी चोरी करणाऱ्या ‘इराणी’ टोळीतील दोघे जेरबंद

जबरी चोरी करणाऱ्या ‘इराणी’ टोळीतील दोघे जेरबंद

ठळक मुद्देडी.बी.पथकाची कारवाई : आरोपींकडून २ लाख २८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : शहरातील विविध परिसरात दुचाकीने फिरुन दोघांनी तीन मोबाईल लंपास केल्याची तक्रार हिंगणघाट पोलिसांना प्राप्त झाली. या तक्ररीच्या आधारे डी. बी. पथकाने तपासचक्र फिरविले असता जबरी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय ‘इराणी’ टोळीतील दोघांना अटक केली. त्यांच्याकडून २ लाख २८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हिंगणघाट पोलीस ठाण्यात ६ एप्रिलला सायंकाळी मोबाईल चोरीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रथक प्रमुख शेखर डोंगरे व त्यांच्या सहकाºयांनी शहरासह लगतच्या परिसरात आरोपींचा शोध घेतला असता, यातील आरोपी नांदगाव चौकाकडून वडनेरकडे गेल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे वडनेर मार्गाने शोध घेत असताना दारोडा टोल नाक्याजवळ दोन व्यक्ती दुचाकीने फिरताना दिसून आले. त्यांची विचारपूस केल्यानंतर त्यांनी उडवा-उडवीचे उत्तरे दिली. त्यांची अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडे सात मोबाईल मिळून आले. त्यांनी शेख साखी जहांगीर बाशा (३३) रा. गंगानगर आणि मोहम्मद शब्बर मोहम्मद शब्बीर (१९) रा. बांगरडीपल्ली, आंध्रप्रदेश अशी नावे सांगितली. दोघांनाही ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणून सखोल चौकशी केली असता दुचाकी निझामाबाद जिल्ह्यातील दासनगर, बोरगाव येथून चोरल्याची कबुली दिली. तसेच अदिलाबाद येथील एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील २० ग्रॅम सोन्याची चैन व तीन मोबाईल हिंगणघाट शहरातून चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी दोघांनाही अटक करुन त्यांच्याकडील सोन्याची चैन, सात मोबाईल, एक दुचाकी व रोख असा एकूण २ लाख २८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडून हिंगणघाटमधील एक तर तेलंगणा राज्यातील चार गुन्हे उघडकीस आले आहे. हे इराणी टोळीतील गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध विविध राज्यात गुन्ह्यांची नोंद असल्याचे सांगितले. ही कारवाई हिंगणघाटचे पोलीस निरीक्षक अमोल लगड यांच्या मार्गदर्शनात शेखर डोगरे, निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर, विजय काळे यांनी केली.
 

 

Web Title: Two members of Iranian gang arrested for robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.