सकाळी ‘ट्विटर वॉर’ अन् दुपारी उडाला ‘लग्नाचा बार’; गोष्ट खासदारपुत्राच्या लग्नाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 08:32 PM2021-09-08T20:32:05+5:302021-09-08T20:32:37+5:30

Wardha news पंकज रामदास तडस यांच्या प्रकरणाला बुधवारी दुपारी अचानक वेगळी कलाटणी मिळाली. पिडित युवतीने पोलीस व समाजमाध्यमांकडे धाव घेतल्यानंतर तातडीने सूत्रे हलली व पंकज तडस आणि पूजा शेंद्रे यांचा विवाह लावून देण्यात आला.

'Twitter War' in the morning and 'Wedding Bar' in the afternoon; The story of the MP's son's wedding | सकाळी ‘ट्विटर वॉर’ अन् दुपारी उडाला ‘लग्नाचा बार’; गोष्ट खासदारपुत्राच्या लग्नाची

सकाळी ‘ट्विटर वॉर’ अन् दुपारी उडाला ‘लग्नाचा बार’; गोष्ट खासदारपुत्राच्या लग्नाची

googlenewsNext
ठळक मुद्देविवाहबंधनात अडकल्याने राजकीय खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा : येथील भाजपच्या खासदार पुत्राने अत्याचार केल्याचा आरोप वर्ध्यातील एका युवतीने केला होता. यासंदर्भात नागपूर येथील पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत चांगलीच खळबळ उडाली. बुधवारी सकाळी या युवतीचा मदत मागणारा एक व्हिडिओ ‘ट्विटर’वरून शेअर करण्यात आला. लागलीच दुपारी खासदार रामदास तडस यांचे पुत्र पंकज आणि ती युवती दोघेही विवाहबंधनात अडकले. अचानक झालेल्या या घडामोडींमुळे सकाळी ‘ट्विटर वॉर’ अन् दुपारी उडाला लग्नाचा बार, अशीच जिल्हाभरात चर्चा होती. ('Twitter War' in the morning and 'Wedding Bar' in the afternoon; The story of the MP's son's wedding)

वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांचे सुपुत्र पंकज तडस यांनी लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. वैदिक पद्धतीने विवाह करून मारझोड करून घराबाहेर हाकलून लावले, असा आरोप पूजा शेंद्रे नामक युवतीने केला होता. यासंदर्भात दरम्यानच्या काळात रामनगर पोलिसांत तक्रारही देण्यात आली होती. हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात दाखल असतानाच पूजाने थेट पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले.

अशातच पूजाने एक व्हिडिओ तयार करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षांना पाठविला. त्यामध्ये ‘ताई येथे माझ्या जिवाला धोका आहे, प्लिज मला येथून घेऊन चला,’ अशी मदत मागितली होती. हा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाचीही धावपळ उडाली. पूजा यांच्या घरासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला. त्यानंतर लागलीच विवाह करण्याच्या दृष्टीने घडामोडींनी वेग घेतला. वर्ध्यातील पांडे सभागृहात मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत पंकज आणि पूजा यांचा वैदिक पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झाला. त्यानंतर दोघांनीही वर्धा नगरपालिकेमध्ये जाऊन विवाह नोंदणी प्रमाणपत्राकरिता प्रक्रिया पार पाडली. अखेर दोघांचाही विवाह पार पडल्याने आतापर्यंत उठलेल्या आरोपांवर सध्यातरी पडदा पडला.

दोघांचाही संसार सुरळीत व्हावा!

मागे काय झालं; यापेक्षा आता काय चांगलं होईल, यादृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजे. पंकज आणि पूजा यांचा वैदिक पद्धतीने विवाह पार पडला असून, नगरपालिकेमध्ये प्रमाणपत्राकरिता रीतसर प्रकरण दाखल करण्यात आले. दोघांनीही सहमतीने विवाह करीत असल्याची कबुली दिली. काही दिवसांपूर्वी रामनगर पोलिसांमध्ये दाखल केलेली तक्रारही पूजा मागे घेणार आहे. आता दोघांचाही संसार सुरळीत चालावा याकरिता आमच्या शुभेच्छा असणार आहेत, अशी प्रतिक्रिया या विवाह समारंभामध्ये सहभागी असलेल्या तडस परिवारातील निकटच्या सदस्याने दिली.

Web Title: 'Twitter War' in the morning and 'Wedding Bar' in the afternoon; The story of the MP's son's wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.