अपघातात ट्रकचा क्लिनर ठार; तर चालक गंभीर जखमी
By Admin | Updated: June 22, 2017 16:50 IST2017-06-22T16:50:01+5:302017-06-22T16:50:01+5:30
अमरावती-नागपूर महामार्गावर गुरूवारी सकाळी ९ वाजता ट्रक उलटून झालेल्या अपघातात ट्रकचा क्लिनर दबून ठार झाल्याची घटना तळेगाव (श्या.पं.) येथे घडली.

अपघातात ट्रकचा क्लिनर ठार; तर चालक गंभीर जखमी
आॅनलाईन लोकमत
तळेगाव (श्या.पं.) (वर्धा) : अमरावती-नागपूर महामार्गावर गुरूवारी सकाळी ९ वाजता ट्रक उलटून झालेल्या अपघातात ट्रकचा क्लिनर दबून ठार झाल्याची घटना तळेगाव (श्या.पं.) येथे घडली. या घटनेत अमिन रजतखान (२६) रा. जामठी नगर, मालेगाव हा ठार झाला तर ट्रकचालक अमिर खान रसीद खान(२३) रा. जामठी नगर, मालेगाव हा गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर आर्वी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे.
मालेगाववरुन अमरावती मार्गे नागपूरकडे टरबुज घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एमएच १८ एए १९७७ हा ट्रक सकाळी ९ वाजताच्या सुमारास अप्पर वर्धा कॉलनी समोर उलटला. या अपघातात क्लिनर ट्रकखाली दबल्याने जागीच ठार झाला आहे. ट्रकचालक गंभीररित्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. अपघात स्थळावर मोठ्या प्रमाणावर टरबूज पडून होते.