डोंगरगाव तलावाच्या भिंतीवरील झाडे धोकादायक
By Admin | Updated: May 4, 2017 00:45 IST2017-05-04T00:45:36+5:302017-05-04T00:45:36+5:30
डोंगरगाव येथील तलावाच्या भिंतीवर झाडेझुडपे वाढली असून त्यामुळे भिंतीला तडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

डोंगरगाव तलावाच्या भिंतीवरील झाडे धोकादायक
ग्रा.पं.चा एक वर्षापासून पाठपुरावा : पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष
सेलू : डोंगरगाव येथील तलावाच्या भिंतीवर झाडेझुडपे वाढली असून त्यामुळे भिंतीला तडे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावर नानबर्डी ग्रामपंचायतने पाटबंधारे उपविभागीय अभियंता यांना असे दोनदा लेखी पत्र दिले. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येते. गावावर मोठी आपत्ती येण्यापूर्वी उपाययोजना करण्याची मागणी आहे.
सेलू तालुक्यात असणारा डोंगरगाव मध्यम प्रकल्पाचे काम १९६५ मध्ये सुरू करुन १९७१ मध्ये प्रकल्प पूर्ण करण्यात आला. यात परिसरातील नानबर्डी, डोंगरगाव, खैरी, ब्राम्हणी, धामणगाव, निंबोळी, पिंपळगाव ही लाभान्वित गावे आहे. या धरणाच्या निर्मितीपासून भिंंतीवर व सभोवताल उगविलेली झाडे आता मोठी झाली आहे. त्यामुळे ही झाडे तोडण्याची गरज आहे. मात्र झाड तोडण्याकडे व नष्ट करण्याचे काम सदर विभागाकडून करण्यात आले नाही, असे येथील नागरिक सांगतात.
या झाडाझुडपांच्या मुळ्या भिंतीत खोलवर गेल्या आहे. मातीची भिंत असल्याने या भिंतीला तडा जात आहे. पाण्याचा साठा वाढल्यावर भिंत फुटण्याचा धोका असल्याने अतिरीक्त झाडे तोडण्याची मागणी आहे. ही भिंत फुटल्यास गावाला धोका निर्माण होवू शकतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने झाडे कापणे सोयीस्कर ठरू शकते. त्यामुळेच भिंतीलगत वाढलेली झाडे त्वरीत तोडावी अशी मागणी नानबर्डीच्या सरपंच योगिता चोरे, उपसरपंच सुरेश लामसोंगे यांनी पत्राद्वारे पाटबंधारे विभागाकडे केली आहे.
या मागणीचे पत्र २० जून २०१६ आणि २० आॅक्टोबर २०१६ ला पाठविण्यात आले. गत सहा महिन्यात या पत्रावर कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने परिसरातील नागरिकांत चिंता व्यक्त्त होत आहे.(शहर प्रतिनिधी)
भिंतीला तडे गेल्यास गावाला धोका
डोंगरगाव प्रकल्पात ४.४४३ द.ल.घ.मी. पाण्याचा उपयुक्त साठा असतो. हे धरण मातीचे असून लांबी ५४३ मीटर तर १६.९८ मीटर उंची आहे. सांडवा क्लिअर ओव्हर फॉल असून ९०.५३ मी. लांबी व ३८२ घ.म.डा.से. महत्तम पुर विसर्ग, धरण माथा पातळी ३०१.६० मी. महत्तम पुर पातळी २९९.७७ मी. पूर्ण संचय पातळी २८७.९५ मी. या धरणाच्या पातळ्या असून या धरणाच्या माध्यमातून एकूण लाभ क्षेत्र १९४० हेक्टर तर ६०८ हेक्टर सिंचन योग्य क्षेत्र आहे. या धरणाच्या भिंतीवरील झाडे वाढली असून त्यामुळे भिंतीला तडे जात आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा लाभ परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांना होत आहे. मात्र त्याची देखभाल होत नसल्याची तक्रार नागरिक करतात. या धरणाच्या भिंतीवरील झाडे वाढली असून त्यामुळे भिंतीला तडे जात आहे. या समस्येची वेळीच दखल घेत उपाययोजना करण्याची गरज ग्रामस्थातून व्यक्त होत आहे.