सेवाग्रामात वृक्ष बचाव आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:01 IST2020-08-18T05:00:00+5:302020-08-18T05:01:06+5:30

विकासाच्या नावावर होणारी ही वृक्षतोड थांबविण्यासाठी गांधीवाद्यांसह पर्यावरणप्रेमींनी तोडलेल्या वृक्षासमोर उभे राहून स्वातंत्र्यदिनी वृक्ष बचाव आंदोलन केले. यावेळी हातामध्ये पर्यावरणपूरक संदेश देणारे विविध फलक घेऊन जनजागृती करण्यात आली. सेवाग्राम ते वर्धा या मार्गावरील १६८ मोठी आणि ऐतिहासिक वृक्षांची कत्तल केली जात आहे.

Tree rescue movement in Sevagram | सेवाग्रामात वृक्ष बचाव आंदोलन

सेवाग्रामात वृक्ष बचाव आंदोलन

ठळक मुद्देपर्यावरणप्रेमींचा सहभाग : कापलेल्या वृक्षांसमोर फलक घेऊन जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत वर्ध्यातील विकासकामांकरिता वर्धा ते सेवाग्राम मार्गावरील वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात आहे. विकासाच्या नावावर होणारी ही वृक्षतोड थांबविण्यासाठी गांधीवाद्यांसह पर्यावरणप्रेमींनी तोडलेल्या वृक्षासमोर उभे राहून स्वातंत्र्यदिनी वृक्ष बचाव आंदोलन केले. यावेळी हातामध्ये पर्यावरणपूरक संदेश देणारे विविध फलक घेऊन जनजागृती करण्यात आली.
सेवाग्राम ते वर्धा या मार्गावरील १६८ मोठी आणि ऐतिहासिक वृक्षांची कत्तल केली जात आहे. यातील बहुतांश वृक्ष महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी यांच्या कालावधीतील आहे. सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत या मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी हे वृक्ष तोडले जात असल्याने गांधीवादी, पर्यावरणप्रेमी तसेच वृक्ष बचाव समितीने एल्गार आंदोलन करून वृक्षतोंड थांबवा; अन्यथा चिपको आंदोलनाचा इशारा दिला. परिणामी, तूर्तास वृक्षतोड थांबवून सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. अशातच या आंदोलनामध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा आणि वृक्षतोड कायमची थांबावी याकरिता जनजागृती करण्यासाठी स्वातंत्र्यदिनी आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामध्ये आनंद निकेतन विद्यालयाच्या संचालिका सुषमा शर्मा, ग्रामसेवा मंडळाच्या अध्यक्ष करुणा फुटाणे, डॉ. उल्हास जाजू, डॉ. शिवचरणसिंह ठाकूर, डॉ. प्रभाकर पुसदकर, बहार नेचरचे प्रा. किशोर वानखेडे, डॉ. एस.पी. कलंत्री, डॉ. दिलीप गुप्ता, मुरलीधर बेलखोडे, अशोक डाखोळे, प्रशांत नागोसे, अद्वैत देशपांडे, डॉ. विभा गुप्ता, निरंजना मारू, डॉ. अनुपमा गुप्ता, आरती गगणे, संगीता चव्हाण यांच्यासह सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, नयी तालिम समिती, कस्तुरबा रुग्णालय, ग्रामसेवा मंडळ, मगन संग्रहालय, निसर्ग सेवा समिती, बहार नेचर, राष्ट्रीय युवा संघटनचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि आनंद निकेतन विद्यालय, कस्तुरबा विद्या मंदिर, सुशील हिंमतसिंगका विद्यालय, अग्रगामी स्कूल या शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक तसेच वर्ध्यातील नागरिकही स्वयंस्फू र्तीने सहभागी झाले होते.

संदेश देणाऱ्या फलकांनी वेधले लक्ष
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत सकाळी ८.३० ते ११ वाजतापर्यंत चाललेल्या या जनजागृती आंदोलनामध्ये आंदोलनकर्त्यांनी तोडलेल्या आणि तोडणार असलेल्या झाडापुढे उभे राहून विविध संदेश देणारे फलक झळकावले. या फलकांवर ‘सावली निवारा देऊन बघा, झाडासारखं वागून बघा, कापू नका माझी मुळे, दुष्काळ उभा राही पुढे, प्रगती करू नका, असे आम्ही म्हणत नाही पण, ८० वर्षे जुने वृक्ष फॅक्टरीमध्ये बनत नाही. हवे अहिंसेचे गाव, नको कुºहाडीचे घाव,’ यासारखे असंख्य संदेश लिहिलेले होते.

ग्रामपंचायतीपेक्षा ग्रामसभा महत्त्वाची आहे. मग, ग्रामपंचायतीच्या एका व्यक्तीने परवानगी दिली म्हणून झाडे तोडायची का? हा प्रश्न माणसाच्या जीवनाशी निगडित असल्याने नागरिकांना विश्वासात घेऊन निर्णयाची प्रक्रिया सर्वानुमते असावी, जेणेकरून चुकीचा निर्णय होणार नाही. विकासाची व्याप्ती सर्व बाजूंनी विचार करूनच ठरविली पाहिजे.
- डॉ. उल्हास जाजू, धन्वंतरीनगर, वरुड (रेल्वे)

शांतीपथ महामार्ग कसा?
सेवाग्राम ते वर्धा हा शांतीपथ आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आश्रमशाळा, महाविद्यालय, कस्तुरबा रुग्णालय आदी या मार्गावर असल्याने या शांतीपथाचे रुपांतर महामार्गामध्ये करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिल्ली, पुणे, बेंगळूरू आदी शहरातील अजस्त्र वृक्ष वाचवून रस्ते बनविण्यात आले. त्यामुळे सेवाग्राम-वर्धा या मार्गाकरिताही हा नियम लागू करावा, अशी मागणी करण्यात आली.

Web Title: Tree rescue movement in Sevagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.