प्रसाधनगृह दोन वर्षांपासून कुलूपबंद
By Admin | Updated: June 23, 2017 01:33 IST2017-06-23T01:33:59+5:302017-06-23T01:33:59+5:30
येथील बसस्थानकावर प्रवाशांकरिता दोन वर्षांपूर्वी प्रसाधनगृह बांधण्यात आले. मात्र येथील प्रसाधनगृह कायम बंद असते.

प्रसाधनगृह दोन वर्षांपासून कुलूपबंद
बसस्थानकातील प्रकार : आठ दिवसांत लोकार्पण न झाल्यास आंदोलनाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : येथील बसस्थानकावर प्रवाशांकरिता दोन वर्षांपूर्वी प्रसाधनगृह बांधण्यात आले. मात्र येथील प्रसाधनगृह कायम बंद असते. त्यामुळे प्रवाशांना कुचंबना सहन करावी लागते. येथील प्रसाधनगृहाचे आठ दिवसात लोकार्पण करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने निवेदनातून देण्यात आला. या मागणीचे निवेदन आगार प्रमुखांना देण्यात आले.
येथील प्रसाधनगृहाचे बांधकाम पूर्ण होऊन दोन वर्ष झाले. लोकार्पण झाले नसल्याने सदर प्रसाधनगृह कुलूप बंद असते. त्यामुळे महिला प्रवाशांना कुचंबना सहन करावी लागते. राज्य परिवहन महामंडळ अधिकाऱ्यांच्या ही बाब अनेकदा लक्षात आणून दिली. मात्र याकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवासी, विद्यार्थी बसची प्रतीक्षा करीत असतात. त्यांना नाईलाजास्तव नैसर्गिक विधी उघड्यावर उरकावे लागतात. मात्र याचे कुणालाच सोयरसुतक नसल्याचे निवेदनात नमुद केले आहे. नागरिकांची अडचण लक्षात घेता येथील प्रसाधनगृह तातडीने नागरिकांच्या सेवेत सुरू करण्याची मागणी शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने करण्यात आली आहे.
समितीचे अध्यक्ष शुभम लुंगे, उपाध्यक्ष कुणाल चोरे, सचिव सुरज खोडके, सहसचिव आकाश देवतारे, किशोर बावने, सुनिल घंगारे, गुड्डू गुजर, प्रविण झाडे, महेश भानारकर, पुष्कर मुरेकर, गुड्डू घंगारे, समीर डाखोळे, आरिफ झिरिया, विक्की पारधी, रोशन चोरे, मयुर सावरकर, संजय खोडके, अजित, समीर, पंकज भानारकर, सिध्दांत खोडके, शुभम डहाके, पंकज निमजे आदींनी बंद प्रसाधनगृहाच्या दाराला हार घालून निषेध नोंदविला. बसस्थानक व्यवस्थापकांना निवेदन देत कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला.
प्रसाधनगृहाला हार घालून केला निषेध
तालुकास्थळाच्या बसस्थानकावरील प्रसाधनगृहाचे लोकार्पण न करता कुलूपबंद ठेवण्यात आले आहे. या प्रकारामागचे रहस्य अद्याप कुणाला कळलेले नाही. प्रसाधनगृह कुलूपबंद असल्याने महिलांची कुचंबना होत आहे. बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. वारंवार मागणी करुनही प्रसाधनगृहाचे कुलूप उघडले जात नसल्याने नागरिकांनी आक्रमक झाले आहेत.