गरीबांच्या हक्काचा तांदळाला देतात हवा तसा आकार आणि सुगंध ; माफिया 'ब्रँड'च्या नावाने तुम्हाला विकत आहेत रेशन तांदूळ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 19:19 IST2025-10-14T19:18:18+5:302025-10-14T19:19:14+5:30
पुलगावातून चालतो काळाबाजार : पोलिसांसह पुरवठा विभागाचे दुर्लक्ष

They give the rice of the poor the desired shape and aroma; the mafia is selling you ration rice under the name of 'brand'!
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गरिबांना दोनवेळचे पोटभर जेवण मिळावे, या उद्देशाने केंद्र सरकारने अन्नसुरक्षा योजना अमलात आणली. त्याअंतर्गत राज्यात रेशनवर फुकट तांदूळ योजना सुरू झाली. स्थानिक पातळीवर या तांदळाचा काळाबाजार आधीपासूनच होता. आता तर त्याला जोर आला आहे. मात्र, आता हा रेशनचा तांदूळ सुगंधी बनवून त्याची बाहेर राज्यात जादा दराने विक्री केली जात आहे. हा सर्व कारभार पुलगाव येथून सुरू असल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वी पोलिसांनी कार्यवाही केली आहे. मात्र, तरीही आजघडीला 'रेशनिंग'च्या तांदळाचा काळाबाजार सुरूच असल्याचे दिसून येत आहे. पुलगाव येथील एका गोदामातून जवळपास ३० लाखांवर रेशनिंगचा तांदूळ साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर पुलगाव शहरातील तीन ते चार काळाबाजार करणाऱ्यांनी आपले 'दुकान' बंद केले होते. मात्र, पुन्हा ते दुकानात काही दिवसांतच सुरू झाले आणि हजारो क्विंटल तांदूळ साठा गोदामातून राईस मिलमध्ये पाठविला जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. याला पुरवठा विभागाकडून मूक संमती असल्याचा आरोप नागरिकांतून केला जातो आहे. तीन ते चार 'बडे' रेशन माफिया पुन्हा एकदा सक्रिय झाले असल्याचे चित्र आहे. त्यांनी पोलिससह पुरवठा विभागालाही 'मॅनेज' केल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कुणी 'बोट' दाखविण्याची हिंमत करत नाही, हे विशेष.
मोठ्या 'ब्रँड'च्या तांदळात केली जाते 'मिक्सिंग'
रेशनचा तांदूळ जमवून तो पॉलिश केला जातो. यावर प्रक्रिया करणारे कारखाने इतके मोठे आहेत की, तेथे रोज हजारो टन तांदळावर प्रक्रिया होते. अत्याधुनिक तंत्राद्वारे तुम्हाला हवा तो आकार व सुगंधाचा तांदूळ बनवला जातो. बासमती, तुकडा यासह असंख्य ब्रॅण्ड येथे प्रक्रिया करून बनविले जातात. १० व २५ किलोची ब्रॅण्डनेम असलेली पोती तयार केली जाते. या तांदळाला डायनास्टी, वोल्गा ट्रिपल ए, दारा डबल स्टार अशी विविध नावे दिली जातात. त्यानंतर रेशनच्या तांदळाची मिक्सिंग करून पुढे जादा दरात विक्री केली जाते.
नाचणगाव, हिंगणघाट, आर्वीत गोदाम
शहरासह जिल्ह्यात घरोघरी फिरुन 'नॉट फॉर सेल' असलेल्या पोत्यातील तांदूळ मोठ्या रेशन तस्करांकडे घेऊन जातात. हे गोदाम नाचणगाव, हिंगणघाट तसेच आर्वी शहरात आहेत. या परिसरात पोलिस विभागाने यापूर्वीही कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, काही दिवस बंद ठेवून पुन्हा काळाबाजार सुरू झाला आहे. या गोदामांची माहिती पोलिसांसह पुरवठा विभागालाही आहे. मात्र, कारवाई का केली जात नाही, हा मोठा प्रश्न आहे. या गोदांमाची तपासणी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे.
"यासंदर्भात तक्रार प्राप्त होताच कारवाई केली जाईल."
- चांदणी शिरपुरकर, तालुका पुरवठा निरीक्षक, वेबळी.