शेतात संत्रा नाही, तरीही १२ हजारांची मदत
By Admin | Updated: November 25, 2014 22:59 IST2014-11-25T22:59:34+5:302014-11-25T22:59:34+5:30
अतिवृष्टी व अवकाळी पाऊस, गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत अनुदानास्वरूपात देण्यासाठी कृषी विभागाच्या सहायकांनी सर्व्हे केला. या सदोष सर्वेमुळे पात्र शेतकरी डावलून

शेतात संत्रा नाही, तरीही १२ हजारांची मदत
कृषी सहायकाचा कारभार: पात्र शेतकरी अनुदानापासून वंचित
अमोल सोटे - आष्टी (शहीद)
अतिवृष्टी व अवकाळी पाऊस, गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत अनुदानास्वरूपात देण्यासाठी कृषी विभागाच्या सहायकांनी सर्व्हे केला. या सदोष सर्वेमुळे पात्र शेतकरी डावलून भलताच प्रकार उजेडात आला. तालुक्यातील रानवाडीमध्ये सरिता मनोहर सावरकर या महिला शेतकऱ्याच्या शेतात संत्रा नसतानाही तिला १२ हजार रुपयांची मदत देण्याचा अफलातून प्रकार कृषी विभागाने केला आहे.
जळगाव (बेलोरा) मधील शेतकरी विनोद पत्रे यांनी गारपीटीमुळे नुकसान झालेल्या गहू व चणा पिकाची भरपाई मागण्यासाठी कृषी विभागाकडे विचारणा केली. संबंधित अधिकाऱ्यांनी एकूण दहा शेतकऱ्यांची मदत इलाहाबाद बँक शाखा वर्धमनेरी येथे पाठविल्याची माहिती दिली. यानंतर शेतकरी नामदेव भातुकलाल, सरिता सावरकर, शंकर अजानकर, वासुदेव आजनकर, राजेंद्र डहाके, विलास भांगे, भीमराव भांगे, जनार्दन आजनकर आणि विनोद पत्रे हे सर्व शेतकरी विड्रॉल करण्यासाठी इलाहाबाद बँकेत गेले. मात्र तेथील अधिकाऱ्यांनी चुकीचा खाते क्रमांक कृषी विभागाने दिल्यामुळे आम्ही रक्कम देवू शकत नाही, असे सांगितले. याची खातरजमा करण्यासाठी शेतकरी विनोद पत्रे यांनी खाते क्रमांक तपासला यात कृषी अधिकाऱ्यांनी चुकीचा क्रमांक पाठविला असल्याचे यादीवरून सिद्ध झाले.
त्यानंतर सर्व शेतकरी तालुका कृषी अधिकारी विजय मेंढजोगे यांना भेटले. त्यांनी यादी दुरुस्त करण्याचे संबंधित कृषीसहायकाला सांगितले; परंतु यादी दुरुस्त झालीच नाही. त्यामुळे इलाहाबाद बँकेच्या अधिकाऱ्याने आष्टीच्या बँक आॅफ इंडियात यादी पाठविली. सदर यादीचा बँक आॅफ इंडिया शाखेशी संबंध नसल्याने व्यवस्थापकांनी खाते क्रमांक चुकीचा असून सर्व रक्कम कृषी विभागाच्या खात्यात परत पाठविली. तरीदेखील कृषी विभागाने परत इलाहाबाद बँकेला पत्र पाठवून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा सल्ला दिला. यादी सदोष असल्यामुळे खात्यात पैसे जमा होवूच शकत नाही, असे बँक अधिकाऱ्यांनी ठणकाहून सांगितले. हा सगळा प्रकार सहा महिन्यापासून सुरू आहे. या बाबत जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या; परंतु त्यावर काहीच कारवाई झाली नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे झाले होते.