उर्ध्व वर्धातून विसर्ग सुरूच
By Admin | Updated: August 7, 2015 01:54 IST2015-08-07T01:54:06+5:302015-08-07T01:54:06+5:30
जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून आलेल्या पावसाचा चांगलाच फटका बसला. सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

उर्ध्व वर्धातून विसर्ग सुरूच
पावसाचा फटका : १९६ गावातील १,१३९ कुटुंबे बाधित झाल्याचा अंदाज
वर्धा: जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून आलेल्या पावसाचा चांगलाच फटका बसला. सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे धाम, मदन उन्नई, वर्धा कार नदी आणि सुकळी लघु प्रकल्पात गत दोन दिवसांच्या पावसाने १०० टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध झाला आहे. धाम प्रकल्पावरून १११.१०, मदन उन्नई धरणावरून ०.७८, उर्ध्व धरण १०३, वर्धा कार नदी ३५.९१, निम्न वर्धा ५५७ आणि सुकळी लघु प्रकल्प १.०९, क्युमेक्सने पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. तर निम्न वर्धाचे ३१ दरवाजे, उर्ध्व वर्धाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दोन दिवसांपूर्वी दमदार पाऊस आला. तर बुधवारी समुद्रपूर वगळता सातही तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. काही भागात या पुराचे पाणी गावात शिरल्याने त्याचा फटका नागरिकांना बसला. तर काही भागात पावसाच्या संततधारीमुळे घरांची पडझड झाली. पडझड झालेल्या घरांचा सर्व्हे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला असला तरी शेतीच्या नुकसानीचा सर्व्हे करणे बाकी असून शेतकऱ्यांना मदतीची मागणी होत आहे.
गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका जिल्ह्यातील १९६ गावांना बसला. तर सततच्या पावसामुळे १ हजार १३९ घरांची पडझड झाली. यात ८८६ घरे अंशत: तर २५३ घरे पुर्णत: बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात गत २४ तासात ७०.७० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस आष्टी तालुक्यात २३.८० मि.मी एवढा नोंदविण्यात आला. आतापर्यंत सर्वाधिक पाऊसही आष्टी तालुक्यातच ६६८. मि.मी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. इतर तालुक्याची पावसाची आकडेवारी कंसात आतापर्यंतच पाऊस वर्धा ३.७० (६६६), सेलू १ (४५१), देवळी ३.२० (५३७.९०), हिंगणघाट ६५२.३२, समुद्रपूर २ (५०५.५१), आर्वी ११ (६३५.३२) आणि कारंजा २२ (६४१.७०) एकूण पाऊस ७०.७० (४७५७.७५), सरासरी ८.८४ (५९४.७२) पावसाची नोंद आहे.
शेताच्या नुकसानीचा सर्वेक्षण करण्यात दिरंगाई
बुधवारी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतात पाणी साचले तर बऱ्याच भागात नदी नाल्याच्या पुराखाली शेती आली. त्यातील पाणी अद्यापही बाकीच आहे. यामुळे शेतात असलेले उभे पीक खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बऱ्याच शेतातील जमीन खरडून गेली आहे. पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताचा सर्व्हे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.