ऑनलाईन झोल! नियम मोडला कारने; दंड दुचाकीचालकाला; 'असा' झाला गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 14:11 IST2022-05-16T14:01:40+5:302022-05-16T14:11:12+5:30
वेगमर्यादा तोडणाऱ्या चंद्रपुरातील कारच्या क्रमांकामधील ‘एच’ ऐवजी ‘एम’ करण्यात आले आणि चलान वर्ध्यातील दुचाकी मालकाला पाठविली. पण, ती चलान कमी करण्यासाठी दुचाकीचालकाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

ऑनलाईन झोल! नियम मोडला कारने; दंड दुचाकीचालकाला; 'असा' झाला गोंधळ
वर्धा : वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांचा तिसरा डोळा कार्यरत आहे. त्यामुळे वाहनाने वेगमर्यादा ओलांडताच वाहनमालकाला ऑनलाईन चलान पाठविली जाते. परंतु चलान देताना कर्मचाऱ्यांकडून ‘ध’ चा ‘म’ झाल्यास वाहनचालकाला नाहक त्रास सहन करावा लागतो. असाच प्रकार नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील जाम चौरस्त्यावर घडला. चारचाकीने चंद्रपुरातील कारचालकाने वेगमर्यादा ओलांडली आणि वर्ध्यातील दुचाकीधारकाला दंड आकारण्यात आला.
गेल्या आठवड्यात वर्ध्यातील दुचाकी मालकाच्या मेलवर अचानक वेगमर्यादा तोडल्याप्रकरणी एक हजार रुपयांच्या दंडाची नोटीस धडकली. त्यांनी याची शहानिशा केली असता जाम चौरस्त्यावर ही घटना घडल्याने त्या नोटीसमध्ये नमूद होते. त्यामुळे वाहनचालकालाही धक्काच बसला. अनेक दिवसापासून दुचाकी किंवा घरची चारचाकीही जाम चौरस्त्यावर गेली नाही, तर हा दंड भरायचा कसा? असा प्रश्न निर्माण झाला. आणखी खोलात गेल्यानंतर वेगमर्यादा तोडणाऱ्या चंद्रपुरातील कारच्या क्रमांकामधील ‘एच’ ऐवजी ‘एम’ करण्यात आले आणि चलान वर्ध्यातील दुचाकी मालकाला पाठविली. पण, ती चलान कमी करण्यासाठी दुचाकीचालकाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. अखेर जाम येथील वाहतूक पोलिसांची संपर्क साधून याबाबत तक्रार केल्यानंतर तेथील वाहतूक पोलिसांनी शहानिशा करून तातडीने दुचाकीची चलान रद्द करून ती कारचालकाला पाठविली. पण, अचानक मिळालेल्या चलानमुळे चांगलाच गोंधळ उडाला होता.
ऑनलाईन चलान अडचणीचे?
ऑनलाईन चलान पाठविताना वाहतूक नियंत्रण पोलिसांकडून चुका होण्याची शक्यता असल्याने त्याचा मनस्ताप वाहनधारकांना करावा लागतो. यासंदर्भात एका वाहतूक पोलिसांना विचारले असता ‘आम्ही जो वाहन क्रमांक नोंदवणार, त्यालाच चलान जाणार’ असे सांगितले. त्यामुळे काहींकडून पूर्वाग्रह दूषित ठेवूनही चालना पाठविण्याची शक्यता असल्याने यात काही तरी अधिकृत नोंद होणे आवश्यक आहे.