गृह अलगीकरणातील कोविड बाधितांवर ‘टेलिफोनीक वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 05:00 AM2020-12-07T05:00:00+5:302020-12-07T05:00:30+5:30

गृहविलगीकरणात असलेल्या कोविड बाधिताशी त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून प्रत्येक दिवशी किमान दोन वेळा त्याच्याशी संवाद साधला जातो. या संवादादरम्यान त्याची प्रकृती कशी आहे, कुठला त्रास तर त्याला जाणवत नाही ना याची शहानिशा केली जाते. प्रकृती ढासळत असल्याचे लक्षात येताच त्या रुग्णाला तातडीने कोविड रुग्णालयात दाखल केले जाते. 

'Telephonic Watch' on Kovid Obstacles in Home Separation | गृह अलगीकरणातील कोविड बाधितांवर ‘टेलिफोनीक वॉच’

गृह अलगीकरणातील कोविड बाधितांवर ‘टेलिफोनीक वॉच’

Next
ठळक मुद्देदररोज भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधून डॉक्टर जाणून घेतात रुग्णाच्या प्रकृतीची माहिती

लाेकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या आठ हजाराहून अधिक झाली असली तरी लक्षणविरहित आणि कोविडची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना स्वयंघोषणापत्र भरून दिल्यावर गृहअलगीकरणात ठेवले जात आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यातील विविध भागात लक्षणविरहित आणि कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या एकूण ३०४ कोविड बाधितांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर टेलिफोनीक पद्धतीने वॉच ठेवला जात आहे. 
गृहविलगीकरणात असलेल्या कोविड बाधिताशी त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून प्रत्येक दिवशी किमान दोन वेळा त्याच्याशी संवाद साधला जातो. या संवादादरम्यान त्याची प्रकृती कशी आहे, कुठला त्रास तर त्याला जाणवत नाही ना याची शहानिशा केली जाते. प्रकृती ढासळत असल्याचे लक्षात येताच त्या रुग्णाला तातडीने कोविड रुग्णालयात दाखल केले जाते. 

डॉक्टरांची विशेष चमू राहते हायअलर्टवर

 एखाद्या लक्षणविरहित तसेच सैाम्य लक्षणे असलेल्या कोविड बाधिताने स्वयंघोषणापत्र भरून दिल्यावर त्या रुग्णाचे घर होम आयसोलेशनसाठी उत्तम आहे काय याची पाहणी केली जाते. त्यानंतर त्या रुग्णाला होम आयसोलेशनसाठी रितसर परवानगी दिली जाते. या रुग्णाला वैद्यकीय अधिकाऱ्याचा भ्रमणध्वनी क्रमांक देत त्यास आवश्यक औषधसाठा दिला जातो. इतकेच नव्हे तर तालुका स्तरावर डॉक्टरांची विशेष चमू नेहमीच हायअलर्टवर राहते.

 गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णाला कोविड वॉर रुममधून दिवसातून किमान दोन वेळा वैद्यकीय तज्ज्ञ फोन करून त्याच्या प्रकृतीची विचारणा करतात. रुग्णाची प्रकृती ढासळत असल्याचे लक्षात येताच तालुकास्तरावरील डॉक्टरांची चमू त्यास तातडीने नजीकच्या कोविड केअर सेंटर किंवा कोविड रुग्णालयात दाखल करतात. इतकेच नव्हे तर गृहअलगीकरणा विषयीचा आढावा जिल्हाधिकारी स्वत: वेळोवेळी घेतात.

सध्या ३०४ कोविड बाधित होम आयसोलेशन मध्ये आहेत. त्यांच्यावर टेलिफोनीक पद्धतीने वॉच ठेवला जात आहे. दररोज त्यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली जाते. प्रकृती ढासळल्यास रुग्णास रुग्णालयात दाखल केले जाते.
- डॉ. अजय डवले,  जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

जिल्ह्यात ४४९ ॲक्टिव्ह कोविड बाधित रुग्ण
 रविवारी जिल्ह्यात ४६ नवीन कोविड बाधित सापडल्याने जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या ८,१४० झाली आहे. तर आज ५३ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७ हजार ४३६ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविला असून जिल्ह्यात सध्या ४४९ ॲक्टिव्ह कोविड बाधित आहेत. त्यांना चांगली आरोग्य सेवा दिली जात आहे.

Web Title: 'Telephonic Watch' on Kovid Obstacles in Home Separation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.