घनकचरा व्यवस्थापनाचे काम कासवगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 23:41 IST2018-09-09T23:40:32+5:302018-09-09T23:41:19+5:30
स्वच्छ सर्वेक्षणच्या माध्यमातून वर्धा न.प.ने नागरिकांना स्वच्छतेचे धडे देत त्यांना स्वच्छचे महत्त्वही पटवून दिले. त्यावेळी वर्धा न.प.च्या या कार्याची दखल घेवून पालिका प्रशासनाला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

घनकचरा व्यवस्थापनाचे काम कासवगतीने
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्वच्छ सर्वेक्षणच्या माध्यमातून वर्धा न.प.ने नागरिकांना स्वच्छतेचे धडे देत त्यांना स्वच्छचे महत्त्वही पटवून दिले. त्यावेळी वर्धा न.प.च्या या कार्याची दखल घेवून पालिका प्रशासनाला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मात्र, त्यानंतर घनकचरा व्यवस्थापनाच्या विषय मार्गी लावण्याकडे होत असलेले दुर्लक्ष न.प.च्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करणारेच ठरत आहे. नजीकच्या इंझापूर येथे सुमारे ३४ एकर जमिनीवर न.प. प्रशासनाच्या पुढाकाराने शहरातील गोळा होणाऱ्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचा कारखाना तयार होणार आहे. पण, सध्यास्थितीत तेही काम कासवगतीनेच होत असल्याचे दिसून येते.
घराघरातून कचरा गोळा करून तो एकाजागी साठवून त्या कचऱ्यापासून खत तयार करण्यासाठी एका खासगी कंपनीला न.प. प्रशासनाने कंत्राट दिला आहे. १ आॅक्टोबर पासून सदर कंत्राटदार आपले काम सुरू करणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, अद्यापही दुरूस्तीचे काम पूर्ण झाले नसल्याचे वास्तव आहे. इतकेच नव्हे तर स्वच्छ व सुंदर वर्धा शहर या उद्देशाने न.प. प्रशासनाने खरेदी केले विविध साहित्य सध्या न.प.च्या निर्माणाधिन इमारतीच्या आवारात धुळखात आहे. तर शहरातील प्रमुख चौकात लावण्यात आलेल्या ओला व सुका अशा वेगवेळ्या अनेक कचरापेट्या अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामादरम्यान तोडण्यात आले आहे. तर ज्या कचरापेट्या कायम आहेत. त्यात काही सुजान नागरिक घरातील व व्यावसायिक प्रतिष्ठानातील कचरा टाकत असल्याचे दिसून येते. अनेक कचरा पेट्या जलवाहीनीच्या कामादरम्यान तोडण्यात आल्याने न.प.चा त्यावर खर्च झालेला निधी वाया गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. यामुळे न.प. प्रशासनाने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.
ट्रॅक्टर जेसीबी व नवीन ट्रॅक्टर ठरत आहे मदतगार
शहरातील विविध भागातील कचºयाचे ढिगारे न.प. प्रशासानाचा स्वच्छता विभाग ट्रॅक्टर जेसीबीच्या सहाय्याने उचलून तो ट्रॅक्टर ट्रॉलीत लादून नियोजित ठिकाणी नेत असल्याचे सांगण्यात आले. शिवाय नव्याने खरेदी केलेले ट्रॅक्टर व ट्रॉली कचरा व्यवस्थापनासाठी न.प.ला मदतगार ठरत असल्याचेही सांगण्यात आले.
काही ‘नम्मा’ झाले सुरू
स्वच्छ वर्धा या उद्देशाने न.प. प्रशासनाने नम्मा टॉयलेटची खरेदी केली. बजाज चौक, वर्धा रेल्वे स्थानक मार्ग, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नम्मा टॉयलेट लावण्यात आले. परंतु, सुरूवातीला काम पूर्ण होऊनही त्याच्या लोकार्पणासाठी मुहूर्त न.प.ला सापडत नव्हता. त्याबाबतचे वृत्त लोकमतने ‘ नम्माच्या उद्घाटनाला मुहूर्त सापडे ना’ या मथळ्याखाली २ जुलैला प्रकाशित करताच काही नम्मा टॉयलेटचे लोकार्पण करण्यात आले. एकूण पाच ठिकाणी नम्मा टॉयलेट लावण्याचे न.प.च्या निश्चित केले आहे हे विशेष.