फाटक्या पादत्राणांना टाचे मारून उसवलेले आयुष्य शिवतो!
By Admin | Updated: March 22, 2015 01:52 IST2015-03-22T01:52:32+5:302015-03-22T01:52:32+5:30
वयाच्या तिसाव्या वर्षी पतीचे निधन झाले. मुलांचे पालन पोषण करून संसाराचा गाडा रेटला. मुले मोठी झाली त्यांचे लग्न झाले.

फाटक्या पादत्राणांना टाचे मारून उसवलेले आयुष्य शिवतो!
प्रफुल्ल लुंगे सेलू
वयाच्या तिसाव्या वर्षी पतीचे निधन झाले. मुलांचे पालन पोषण करून संसाराचा गाडा रेटला. मुले मोठी झाली त्यांचे लग्न झाले. आता सर्व सुरळीत होईल असे वाटत असताना अचानक दोन करत्या मुलांना मृत्यूने कवटाळले. पुन्हा त्यांच्या परिवाराच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी आली. आपल्या फाटक्या संसाराच्या भरण पोषणाकरिता नागरिकांंच्या फाटक्या चपला शिवून व बूट पॉलीश करून वयाच्या ७० व्या वर्षी लक्ष्मीचा जीवनाशी लढा सुरू आहे. लोकांच्या फाटक्या पादत्राणांना टाचे मारून आपले आयुष्य शिवत असल्याचे लक्ष्मीबाई सहज बालून जातात.
येथील मेडिकल चौकात उन्ह, वारा, पाऊस याची तमा न बाळगता लक्ष्मीबाई रामलाल देवरे यांचे काम सुरूच आहे. लोकांच्या फाटलेल्या पदत्राणाला शिवून व बुटपॉलीश करीत मिळालेल्या तुटपुंज्या कमाईवर फाटक्या संसाराला ढिगळ लावण्याचे काम त्यांच्याकडून अविरत होत आहे.
लक्ष्मीबाईचे पती रामलाल यांचे सुमारे ४० वर्षांपूर्वी निधन झाले. तिला रामू, सुरेश व खुशाल अशी तीन मुले होती. त्यांच्या लग्नानंतर तिघाही मुलांना मुलेबाळे झाली. नातू व नाती आजीच्या लाडात वाढत असताना अचानाक मुलगा रामू याला विजेचा धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याची पत्नी एक मुलगा व दोन मुली उघड्यावर आल्या. हे दु:ख उराशी असताना दुसरा मुलगा सुरेशचे आकस्मिक निधन झाले. दोन मुलाच्या मृत्यूमुळे लक्ष्मीबाईवर आभाळ कोसळले. दोन्ही मुलांच्या पत्नी व तिच्या मुलाला घेवून लक्ष्मीबाई त्यांच्या कुटुंबाला हातभार लावीत असून नातवाला शिकविण्यासाठी धडपडत आहे.
खुशाल नावाचा मुलगा आपल्या परिवारासह दोन मुले व एका मुलीला घेवून तालुक्यातील गायमुख येथे राहतो. मृतक मुलगा सुरेशची पत्नी अरूणा व नातू उदय (११) याच्यासोबत लक्ष्मीबाई कोथीवाडा वसाहतीत राहते. लक्ष्मीबाईला श्रावणबाळ योजनेचे तुटपुंजे मानधन व चपला जोडे शिवण्यातून कधी ५० तर कधी १०० रुपये रोज मिळतो.
शहराच्या गजबजलेल्या मेडिकल चौकात ७० वर्षीय वृद्ध ग्राहकांच्या प्रतीक्षेत उन्ह, वारा, पाऊस झेलत आपल्या फाटक्या संसाराला ठिगळ लावण्यासाठी लक्ष्मीबाईला दिवसभर परिश्रम करताना पाहून धडधाकट माणसालाही ती लाजविते. शासनाच्या योजना लक्ष्मीबाईकरिता त्या कुचकामी ठरत आहेत. यामुळे या योजना गरजवंताकरिता वा केवळ नावाच्याच असा प्रश्न समोर येत आहे.