वर्धा जिल्ह्यातील जलाशये अर्धेअधिक भरली; गेल्या वर्षी होता ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 03:52 PM2020-07-22T15:52:36+5:302020-07-22T15:59:17+5:30

गेल्या महिन्यात आणि या जुलै महिन्यांमध्ये दमदार पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने वर्धा जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघू अशा सर्वच जलाशयांची पातळी ५० टक्केच्या वर गेली आहे.

sufficient water stock in lakes in Wardha district | वर्धा जिल्ह्यातील जलाशये अर्धेअधिक भरली; गेल्या वर्षी होता ठणठणाट

वर्धा जिल्ह्यातील जलाशये अर्धेअधिक भरली; गेल्या वर्षी होता ठणठणाट

googlenewsNext
ठळक मुद्देमोठ्या ११ तर २० लघु प्रकल्पांचा समावेश गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचा जोर

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : प्रारंभी पावसाने दडी मारल्यामुळे जलाशयांची पातळी खालावली होती. मात्र गेल्या महिन्यात आणि या जुलै महिन्यांमध्ये दमदार पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघू अशा सर्वच जलाशयांची पातळी ५० टक्केच्या वर गेली आहे. गेल्यावर्षी या महिन्यापर्यंत ठणठण असलेल्या जलाशयात यावर्षी मात्र पाण्याची मुबलकता दिसून येत आहे.

जिल्ह्यातील आठही तालुक्यात ११ मोठे तर २० लघू व मध्यम जलाशय आहेत. गेल्यावर्षी २१ जूलैपर्यंत आठही तालुक्यामध्ये १६१८.९७ मिलीमीटर पावसाची नोेंद करण्यात आली होती. यावर्षी याच कालावधीमध्ये २९३६.६५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे डोंगरगाव प्रकल्प हाऊसफुल्ल झाला असून वर्धा कारनदी प्रकल्पही ९७.६१ टक्के भरला आहे. सोबतच दहेगाव (गोंडी) हा लघू प्रकल्प ९९.०० टक्के भरला आहे. यासह आंजी बोरखेडी, रोठा-२, आष्टी, पिलापूर, कन्नमवारग्राम, परसोडी हे लघू प्रकल्पातही सध्या ७० टक्क्यापेक्षा अधिक जलसाठा आहेत. जिल्ह्यात उशिराका होईना पण, दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. विशेषत: सर्वच तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. अजून दमदार पावसाचे दिवस शिल्लक असल्याने यावर्षी सर्वच जलाशये हाऊसफुल्ल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दोन जलाशयाची दारे उघडली
वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नांद प्रकल्प, वडगाव प्रकल्प, उर्ध्ववर्धा प्रकल्प आणि बेंबळा प्रकल्पाचा वर्ध्यासह नागपूर, अमरावती, यवतमाळ याही जिल्ह्याला मोठा फायदा होतो. यापैकी नांद प्रकल्प वगळता इतर सर्वच जलाशयांची पातळी ६० टक्क्यापेक्षा अधिक असल्याने वडगाव प्रकल्पाचे तीन तर बेंबळा प्रकल्पाचे २ गेट गेट १० से.मी.ने उघडण्यात आले आहे. त्यामुळे लगतचे नदी, नालेही ओसंडून वाहत आहे.

Web Title: sufficient water stock in lakes in Wardha district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी