वर्धा : जिल्ह्यात बुधवारी मतदान झाले. चारही विधानसभा मतदार संघातील ६९ उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात बंद झाले. या मतपेट्या मतदानानंतर प्रत्येक तालुक्याकरिता असलेल्या स्ट्रॉगरूममध्ये पोहोचल्या आहेत. या स्ट्राँगरूमची पाहणी जिल्हाधिकारी नवीन सोना यांनी गुरुवारी केली. स्ट्राँगरूमवर कुठलीही गडबड होणार नाही याकरिता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तीन दिवस या रूममध्ये मतपेट्या ठेवून रविवार दि. १९ ला त्यांची मतमोजणी करण्यात येणार आहे.वर्धेत संपूर्ण मतदान झाल्यानंतर मतदानाची टक्केवारी स्पष्ट झाले. जिल्ह्यात एकूण ६६.४८ टक्के मतदान झाले. यात ६९.२५ पुरूष तर ६३.४९ टक्के महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. चारही विधानसभा क्षेत्रात झालेल्या मतदानात सर्वांधीक मतदान हिंगणघाट ७१.७५ टक्के मतदान झाले. येथे मतदान करण्यात महिलांची टक्केवारी ६८.८१ तर पुरूषांची टक्केवारी ७४.४१ टक्के आहे. सर्वात कमी मतदान वर्धा विधानसभा क्षेत्रात झाले. येथे केवळ ५८.१३ टक्के मतदान झाले. येथे महिलांची टक्केवारी ५५.२१ तर ६०.९० टक्के पुरूषांनी मतदान केले. आर्वी विधानसभा मतदार संघात ६८.१३ टक्के मतदान झाले. यात ७०.९४ टक्के पुरूष तर ६५.१३ टक्के महिलांनी मतदान केले. देवळी मतदार संघात एकूण ६७.९२ टक्के मतदान झाले. यात ७०.७७ टक्के पुरूष तर ६४.८० टक्के महिलांनी मतदान केले. (प्रतिनिधी)
मतपेट्या पोहोचल्या स्ट्राँगरूममध्ये
By admin | Updated: October 16, 2014 23:28 IST