वर्धा : अनेक जिल्ह्यांमध्ये पक्षामध्ये छोटे-छोटे वाद आहेत. मात्र, भाजप हा पक्ष नसून परिवार आहे. परिवारात कुरबुरी असतात. तथापि, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणीही पक्षविरोधी कारवाया करू नये. कोणी पक्षविरोधी कारस्थान केल्यास पक्ष कठोर कारवाई करील, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला.
सेवाग्राम येथील चरखागृहात सोमवारी भाजपचा विदर्भ विभागीय नियोजन मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मेळाव्याला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकासमंत्री प्राचार्य डॉ. अशोक वुईके, कामगारमंत्री आकाश फुंडकर, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, भाजप जिल्हाध्यक्ष संजय गाते यांच्यासह विदर्भातील खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, एकाने दुसऱ्याचे आणि दुसऱ्याने पहिल्याचे पाय ओढल्याने अनेक पक्षांचे पतन झाले. आपल्या पक्षातही अनेक जिल्ह्यांमध्ये नेते, कार्यकर्त्यांमध्ये छोटे वाद आहेत. मात्र, आपला पक्ष एक परिवार आहे. परिवारातील वाद सामोपचाराने सुटतील. निवडणुकीपूर्वी सर्वांनी वाद निकाली काढून विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे काम करायचे आहे. जनता आपल्याला अनुकूल आहे. त्यामुळे लोकांसमोर जाऊन आपल्या सरकारने केलेले काम व आपले व्हिजन त्यांना सांगा. राज्य सरकारने अनेक विकासकामे केली आहेत, ती जनतेसमोर मांडण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले.
आपली पार्टी बजरंगबलीसारखीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपली पार्टी बजरंगबलीसारखी आहे. बजरंगबलींना आपल्या क्षमतेची जाणीव नव्हती. ती जाणीव त्यांना करून दिल्यानंतर ते एका उडीत लंकेत पोहोचले, तसेच आपले कार्यकर्ते आहेत. निवडणूक झाली की ते शांत बसतात. मात्र, पुढील तीन महिने शांत बसू नका, असा सल्ला त्यांनी दिला.
‘महायुती’ म्हणूनच लढू; पण स्थानिक स्तरावर काही निर्णय
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आपण महायुती म्हणूनच लढणार आहोत. मात्र, काही ठिकाणी स्थानिक स्तरावर निर्णय घेतले जातील. अशा ठिकाणी मित्रपक्षांवर टीका करू नका, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला. शक्यतो पहिले जिल्हा परिषद आणि नगर परिषदांच्या निवडणुका होतील, नंतर महापालिकांच्या निवडणुका होतील, असा कयास त्यांनी बांधला.
भाषेवरून समाजाला विभाजित करण्याचा प्रयत्न
निवडणुकीच्या तोंडावर विरोधक भाषेवरून समाजाला विभाजित करण्याचा प्रयत्न करतील. जातीपातींचे नरेटिव्ह पसरवले जातील. जाणीवपूर्वक वाद घातले जातील. मात्र, ‘ये पब्लिक है, सब जानती है’, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.