देवळी तालुक्याला वादळाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST2020-06-12T05:00:00+5:302020-06-12T05:00:12+5:30
भिडी वितरण केंद्राअंतर्गत काही ठिकाणी ४ वीजखांब तुटून पडले. तसेच १८ खांब वाकले. या भागात १४ झाडे वीजतारांवर पडल्यामुळे मोठे नुकसान झाले. महावितरणने गुरुवारी सकाळपासून युद्ध पातळीवर काम करून या गावातील वीजपुरवठा सुरळीत केला. परंतु शेतशिवारातील कृषिपंपाबाबत नाईलाज असल्याचे सांगण्यात आले.

देवळी तालुक्याला वादळाचा तडाखा
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : तालुक्यातील काही गावांना बुधवारी सायंकाळी वादळी पावसाने तडाखा दिला. यामध्ये १७ राहती घरे अंशत: पडून जनजीवन विस्कळीत झाले. तसेच गाव व परिसरातील महावितरण कंपनीचे ५० वीजखांब पोल व तारा धाराशाही झाल्या. यामध्ये काही खांब पूर्णत: तुटले व काही वाकून खाली पडले. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा रात्रभर खंडित होता. महावितरण कंपनीचे या निसर्ग कोपात ४० लाखाचे नुकसान झाले.
सायंकाळच्या सुमारास एकाएकी वादळी पावसाला सुरुवात झाली. काही क्षणातच सुसाट वाहणाऱ्या वादळाने काही गावातील घरे कवेत घेतली. आगरगाव, पळसगाव, सोनेगाव (आबाजी) जामणी आदी गावातील १७ घरे अंशत: पडली. तसेच काही घरांचे किरकोळ नुकसान झाले.
देवळी ग्रामीण भागातील नांदोरा, पळसगाव, चिकणी, निमगाव, पढेगाव या गाव परिसरातील महावितरण कंपनीचे १० वीजखांब पोल पूर्णत: तुटून पडले. तसेच डिगडोह, इसापूर, सोनेगाव आबाजी, फत्तेपूर, येसगाव, मुरदगाव या भागातील १५ खांब वाकून विद्युत तारा तुटून खाली पडल्या.
भिडी वितरण केंद्राअंतर्गत काही ठिकाणी ४ वीजखांब तुटून पडले. तसेच १८ खांब वाकले. या भागात १४ झाडे वीजतारांवर पडल्यामुळे मोठे नुकसान झाले. महावितरणने गुरुवारी सकाळपासून युद्ध पातळीवर काम करून या गावातील वीजपुरवठा सुरळीत केला. परंतु शेतशिवारातील कृषिपंपाबाबत नाईलाज असल्याचे सांगण्यात आले. वीजखांब व तारा जोडणीच्या कामाला १५ दिवसांचा अवधी लागणार असल्याने या भागातील कृषिपंप बंद राहणार आहेत. महावितरणचा नुकसानीचा आकडा ४० लाखांच्या घरात असल्याचा अंदाज शाखा अभियंता सुदेश होले यांनी यावेळी व्यक्त केला. अंशत: पडलेल्या घरांचे पंचनामे करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार राजेश सरवदे यांनी दिली. काही ठिकाणी झाडे पडून वाहतुकीस अडथळा आला.