राज्य उत्पादन शुल्क विभागाची ‘ब्राईट’ हॉटेलवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 06:00 IST2019-09-27T06:00:00+5:302019-09-27T06:00:14+5:30
निवडणुकीच्या काळात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी तसेच आचारसंहितेचे कुठेही उल्लंघन होऊ नये त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने जिल्हाभरात कारवाईला गती दिली आहे. यातूनच बुधवारी रात्री पावणे दहा वाजता नागपूर मार्गावरील हॉटेल ब्राईटमध्ये धाड घातली तेव्हा हॉटेलमध्ये विदेशी दारूच्या विविध कंपनीच्या २६७ बाटल्या आढळून आल्या. या दारूची किंमत ४९ हजार ८८० रुपये असल्याचे सांगण्यात आले.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची ‘ब्राईट’ हॉटेलवर धाड
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामनगर, नालवाडी, हिंदनगर व सिंदी (मेघे) परिसरात खुलेआम दारूविक्री होत असताना रामनगर पोलिसांचे याकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष होत आहे. याच पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नालवाडी परिसरातील हॉटेल ब्राईटमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड घालून विदेशी दारूसाठा जप्त केला. त्यामुळे येथील दारूविक्रीची माहिती रामनगर पोलिसांना नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
निवडणुकीच्या काळात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी तसेच आचारसंहितेचे कुठेही उल्लंघन होऊ नये त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने जिल्हाभरात कारवाईला गती दिली आहे. यातूनच बुधवारी रात्री पावणे दहा वाजता नागपूर मार्गावरील हॉटेल ब्राईटमध्ये धाड घातली तेव्हा हॉटेलमध्ये विदेशी दारूच्या विविध कंपनीच्या २६७ बाटल्या आढळून आल्या. या दारूची किंमत ४९ हजार ८८० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
हा सर्व दारूसाठा जप्त करून हॉटेल मालकाला ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क विभाग करीत आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्त मोहन वरदे, अधीक्षक सुभाष बोडखे यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाचे निरीक्षक पी. जी. सावंत, दुय्यम निरीक्षक एस.डी.घुले, उपनिरीक्षक भावना धिरड तसेच कर्मचारी यु. बी. शहाणे, के.टी. डोंगरे, जी. एस. बावणे व आर. एम. म्हैसकर यांनी केली.
अनेक हॉटेल्समध्ये मिळते दारू
नागपूर मार्गालगत अनेक हॉटेल आहेत. येथे अनेक दिवसांपासून अवैध दारूविक्री केली जाते. शिवाय, येथे रिचविण्याचीही व्यवस्था असल्याने या हॉटेल्सना सायंकाळनंतर गार्डन बारचे स्वरूप येते. मात्र, रामनगर पोलिस कारवाईचे धाडस दाखवित नाही. किरकोळ दारूविक्रेत्यांवर नाममात्र छापे घालून कारवाईचे सोंग करीत आहे.