हृदयद्रावक! एसटीनं डोळ्यादेखत पत्नीला चिरडलं; वृद्धावर कोसळला दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 18:50 IST2021-07-22T18:49:26+5:302021-07-22T18:50:56+5:30

धाडीच्या बसथांब्यावरील अपघात; बँकेच्या कामाकरिता साहुरला जात होते दाम्पत्य

ST bus crushed elderly women infront of her husband in vardha | हृदयद्रावक! एसटीनं डोळ्यादेखत पत्नीला चिरडलं; वृद्धावर कोसळला दु:खाचा डोंगर

हृदयद्रावक! एसटीनं डोळ्यादेखत पत्नीला चिरडलं; वृद्धावर कोसळला दु:खाचा डोंगर

- मंगेश ढवळे

साहूर : वृद्धापकाळात पती-पत्नीच एकमेकांचा आधार असल्याने वृद्ध दाम्पत्य बँकेच्या कामानिमित्त सोबतीने निघाले होते. अशातच काळ बनून आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीने वृद्धाच्या डोळ्यादेखत सहचारिणीस चिरडले. रस्त्यावर निपचित पडलेल्या आपल्या वृद्ध पत्नीला वाचविण्यासाठी वृद्धाने पूर्ण प्राण एकवटून मदतीची मागणी केली. लागलीच नागरिकांनी धाव घेऊन गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या वृद्धेला रुग्णालयाकडे रवाना केले. पण, वाटेचत त्यांचा मृत्यू झाल्याने वृद्धाला मोठा धक्का बसला आहे. ही घटना धाडी येथील बसथांब्यावर घडली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मृत कमलाबाई गोविंदराव ठाकरे (७०) आणि त्यांचे पती गोविदराव ठाकरे (७५) रा. धाडी, हे दाम्पत्य सोबतीने गुरुवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास बँकेच्या कामानिमित्त साहूरला जाण्याकरिता निघाले होते. बस मिळावी म्हणून ते दोघेही धाडी येथील बसथांब्याकडे जात होते. या दरम्यान कमलाबाई आर्वी आगारातील एम.एच.४० एन.८४२९ क्रमांकाच्या वर्धा-वरुड या महामंडळाच्या एसटीच्या मागच्या चाकाखाली आल्या. यात चिरडल्या गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. डोळ्यादेखत सहचारिणी रस्त्यावर तडफडत असताना पाहून गोविंदरावांचा गलबला सुरु झाला. मदतीसाठी त्यांनी थकलेल्या आवाजात टाहो फोडला. लागलीच समाजसेवक दिनेश लांडे, प्रशांत गावंडे, राहुल घोरमाडे, अनिल चोरे, देवराव भलावी व संदीप चोरे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांना धनराज गरजे यांच्या खासगी मिनीबसमध्ये टाकून वरुड येथील ग्रामीण रुग्णालयाकडे प्रवास सुरु केला. परंतु गंभीर दुखापत झाल्याने कमलाबाईने वाटेतच अखेरचा श्वास घेतला. या अपघातानंतर आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बस ताब्यात घेत पोलीस ठाण्यात लावली. याप्रकरणी बसचालक अनिल उंदरे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. वृत्त लिहिस्तोवर आष्टी पोलिसांनी गुन्हाची नोंद केली नव्हती. पुढील कारवाई आष्टी पोलीस करीत आहे.

धाडी बसस्थानकासमोर रस्ता दुभाजकाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने वारंवार अपघात घडल आहे. या सिमेंट मार्ग झाल्यामुळे वाहनेही सुसाट धावतात. त्यामुळे या मार्गावरील अपघात रोखण्याकरिता गतिरोधक देण्याची गरज आहे.
दिलीप भाकरे,सदस्य, ग्रा.पं. धाडी

Web Title: ST bus crushed elderly women infront of her husband in vardha