सोयाबीनचे दर निम्म्यावर; सोंगणीचे दर मात्र दुपटीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 05:00 IST2021-10-13T05:00:00+5:302021-10-13T05:00:51+5:30
सप्टेंबर महिन्यात पावसाने उसंत घेत पुन्हा सततचा पाऊस पडल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. यामुळे मजूरही दुपटीने वाढविले. १२ हजारांवर गेलेले सोयाबीनचे दर ४ हजारांवर आणले. यात शेतकरी चांगलाच भरडला गेला. सोयाबीनच्या पिकांची सोंगणी जिल्ह्यात सर्वत्र एकाच वेळेस येत असल्याने मजुरांची चांगलीच कमतरता भासते.

सोयाबीनचे दर निम्म्यावर; सोंगणीचे दर मात्र दुपटीवर!
विनोद घोडे
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामनी) : सोयाबीन सोंगणीचा हंगाम सुरू होताच १२ हजारांपर्यंत पोहोचलेले दर कोसळले असून, जिल्ह्यांत पाऊस झाल्याने सोंगणीचे दर दुप्पट झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मागील वर्षी सोयाबीन पिकाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे पाठ फिरविली होती. पूर्णत: पीकच हातचे गेले होते. याची उणीव भरून काढण्यासाठी या वर्षी नव्या जोमाने शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आणि पिकेही बहरली. पण, ऐन सोंगणीच्या तोंडावर निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला असून त्यांची चांगलीच फजिती झाली.
सप्टेंबर महिन्यात पावसाने उसंत घेत पुन्हा सततचा पाऊस पडल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. यामुळे मजूरही दुपटीने वाढविले. १२ हजारांवर गेलेले सोयाबीनचे दर ४ हजारांवर आणले. यात शेतकरी चांगलाच भरडला गेला. सोयाबीनच्या पिकांची सोंगणी जिल्ह्यात सर्वत्र एकाच वेळेस येत असल्याने मजुरांची चांगलीच कमतरता भासते.
ऐन वेळेवर मजूर मिळणे कठीण जाते. यासाठी जिल्ह्यातील शेतकरी पूर्व विदर्भातून मजूर आणतात, म्हणून सोयाबीनची सोंगणी तरी होते. या वर्षी जिल्ह्यात सोयाबीनच्या उत्पादनाची उतारी सरासरी पाच पोते होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच डिझेलची दरवाढ झाल्याने सोयाबीनची मळणीही महागली. प्रतिक्विंटल २५० रुपये झाली असून चिंता वाढली आहे.
मजूर मिळेना
- दिवसेंदिवस शेतीकामासाठी मजूर मिळणे कठीण होत आहे. मजूर वर्ग सध्या इतर क्षेत्रातील कामांकडे वळला आहे.
- शेतीची कामे नको रे बाबा, असे म्हणत शेती कामाकडे पाठ फिरवीत असल्याचे दिसून येते. यामुळे मजूर मिळणे कठीण झाले आहे.
शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार ?
चार ते पाच वर्षांपासून सतत नापिकीच्या झळा शेतकऱ्यांना सोसाव्या लागत आहे. यावर्षी मागील महिन्यात झालेल्या अति पावसाने सोयाबीनची पुरती वाट लागली. सोयाबीनमध्ये मातीचे प्रमाण अधिक असून काळसर झाले. यामुळे किती भाव मिळेल सांगता येत नाही.
- भास्कर काकडे, शेतकरी, चिकणी.
लागवड खर्च एकरी २० हजार रुपये, त्यानंतर सोंगणी २५०० रुपये, मळणी २५० प्रति क्विंटल आणि उतारा पाच पोते, भाव किती मिळेल याची शाश्वती नाही, यामुळे लागवड खर्चही निघणे कठीण आहे.
- नरेंद्र येणकर, शेतकरी, जामनी.