वर्ध्यात विवाहितेवर सामुहिक अत्याचारप्रकरणी सहा आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 20:32 IST2020-06-28T20:29:54+5:302020-06-28T20:32:20+5:30
वर्ध्यात विवाहितेवर सामुहिक अत्याचार प्रकरणी सहा आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

वर्ध्यात विवाहितेवर सामुहिक अत्याचारप्रकरणी सहा आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नोकरीच्या आमिष देत मुलाखतीकरिता फार्महाऊसवर नेत बळजबरीने आळीपाळीने सहा आरोपींनी पीडितेवर अत्याचार केला. शनिवारी रात्री ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी सावंगी पोलिसांनी सहा आरोपींना अटक करीत रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहाही आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी केली.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, पीडितेला सिंदी (रेल्वे) येथून पवनार येथील शेखर सुरेश चंदनखेडे याने नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने सावंगी (मेघे) येथे बोलाविले. पीडिता आपल्या पतीसह सावंगी येथे आली असता शेखरने पीडितेसह तिच्या पतीला कारमध्ये बसवून सेलसुरा येथील फार्महाऊसवर नेले. तेथे अगोदरच पाच युवक उपस्थित होते. पीडितेच्या पतीला बांधून ठेवत पीडितेवर सहाही युवकांनी आळीपाळीने बळजबरीने अत्याचार केला. सावंगी पोलिसांनी या प्रकरणात शेखर सुरेश चंदनखेडे (२४) रा. पवनार, लोकेश उर्फ अभिजित गजानन इंगोले (२४) रा. तुकाराम वॉर्ड, हेमराज बाबा भोयर (३९) रा. सिंदी (मेघे), नितीन मारोतराव चावरे (२७), राहुल बनराज गाडगे (२८) दोन्ही रा. खरांगणा, पनिंदाकुमार श्रीनिवास बलवा (२६) रा. सिंदी (मेघे) यांना अटक करून रविवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने २ जुलैपर्यंत आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
आरोपींना अशी केली अटक
पीडितेने तक्रार नोंदविताच सावंगीचे ठाणेदार रेवचंद सिंगणजुडे यांनी वेगाने तपासचक्र फिरवून गुन्हे शोध पथकातील चमूला घटनास्थळी पाठविले. एका पथकाने पहाटेपर्यंत पंचनामा केला, तर दुसऱ्या पथकाने आरोपींचा माग घेत मुख्य आरोपी शेखर चंदनखेडे यास पवनारातून अटक केली. त्याच्या बयाणानुसार इतर पाच आरोपींना अवघ्या दोन तासांतच पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.