नागपुरात जैन मंदिरातून चांदीच्या मूर्तींची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद, सिंहासने, छत्री आणि दानपेटीतील २ लाख रुपयांची रक्कमदेखील लंपास
By योगेश पांडे | Updated: February 28, 2025 21:37 IST2025-02-28T21:36:20+5:302025-02-28T21:37:24+5:30
Nagpur Crime News: लोकांची घरेच नव्हे तर आता शहरात मंदिरेदेखील चोरट्यांपासून सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. ग्रेट नाग रोड, जुनी शुक्रवारी येथील श्री शितलनाथ दिगंबर जैन मंदिरातून रात्रीच्या सुमारास चोरट्याने चांदीच्या मूर्ती, सिंहासन, छत्री तसेच दानपेटीतील सुमारे दोन लाखांची रोकड लंपास केली.

नागपुरात जैन मंदिरातून चांदीच्या मूर्तींची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद, सिंहासने, छत्री आणि दानपेटीतील २ लाख रुपयांची रक्कमदेखील लंपास
- योगेश पांडे
नागपूर - लोकांची घरेच नव्हे तर आता शहरात मंदिरेदेखील चोरट्यांपासून सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. ग्रेट नाग रोड, जुनी शुक्रवारी येथील श्री शितलनाथ दिगंबर जैन मंदिरातून रात्रीच्या सुमारास चोरट्याने चांदीच्या मूर्ती, सिंहासन, छत्री तसेच दानपेटीतील सुमारे दोन लाखांची रोकड लंपास केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
श्री शितलनाथ दिगंबर जैन मंदिरात दररोज जैन भाविक पूजाअर्चनेसाठी येतात. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास टी शर्ट घातलेला एक चोरटा मंदिरात शिरला. त्याने मंदिरातील दानपेटीकडे रोख वळविला. त्याने मंदिरातून पाच चांदीच्या मूर्ती, १२ सिंहासने, एक चांदीची छत्री तसेच दानपेटीतील सुमारे दोन लाखांची रोकड चोरली. चोरट्याने ५० रुपये किंवा त्याहून कमी किंमतीच्या नोटा न चोरता केवळ मोठ्या नोटांवरच हात मारला. त्यानंतर तो तेथून फरार झाला. सकाळी सहा वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याची माहिती मंदिर व्यवस्थापनातील सदस्यांना देण्यात आली. कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक मंदिरात पोहोचले. चोरीची ही बातमी जैन बांधवांमध्ये वेगाने पसरली. त्यांच्यात संतापाचे वातावरण आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिराच्या मागील भागातून चोरट्याने आत प्रवेश केल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मंदिरात शिरल्यानंतर आरोपीने मंदिरात पूर्ण पाहणी केली व त्यानंतर दानपेटी फोडून पैसे काढले, अशी माहिती मंदिराचे उपाध्यक्ष राजकुमार जैन यांनी दिली.