‘जवाद’चा झटका; उभ्या पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 05:00 IST2021-10-18T05:00:00+5:302021-10-18T05:00:11+5:30
जवाद चक्रीवादळामुळे उसंत घेत पुन्हा पावसाने हजेरी लावली. पण याच पावसामुळे उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला असून कापूस व सोयाबीन उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. उसंत घेत जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे झाडाला लागून असलेला कापूस भिजल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले आहे. तर सध्या काही शेतकरी मिळेल तेथून शेतमजूर आणून सोयाबीन मळणीच्या कामाला गती देत आहेत.

‘जवाद’चा झटका; उभ्या पिकांना फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बंगालची खाडी तसेच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. शिवाय ‘जवाद’ चक्रीवादळ आध्र प्रदेशातील किनारपट्टीवर धडकल्याने विदर्भ, मराठवाडा, छत्तीसगड तसेच मध्यप्रदेशात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एकूणच जवाद चक्रीवादळामुळे उसंत घेत पुन्हा पावसाने हजेरी लावली. पण याच पावसामुळे उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला असून कापूस व सोयाबीन उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. उसंत घेत जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे झाडाला लागून असलेला कापूस भिजल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले आहे. तर सध्या काही शेतकरी मिळेल तेथून शेतमजूर आणून सोयाबीन मळणीच्या कामाला गती देत आहेत. परंतु, थोड्या अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे कापणी पश्चात ढीग करून ठेवलेले सोयाबीन भिजल्याने सोयाबीन उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे.
कुटारही भिजले
- जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला जोडव्यवसाय म्हणून पशुपालनाची जोड दिली आहे. पण शनिवारी झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मालकीचे सोयाबीनचे कुटार पावसामुळे भिजल्याने त्यांना सध्या जनावरांच्या वैरणाचा प्रश्न भेडसावत आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात तणनाशकाचा वापर केला जात असल्याने जनावरांसाठी हिरवा चारा मिळणे दुरापास्त झाले असल्याचे वृद्ध शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते.
आपण यंदा १५ एकर शेतजमिनीत सोयाबीनची लागवड केली. पण शनिवारी झालेल्या पावसामुळे कापणीपश्चात ढीग करून ठेवलेले सोयाबीन पूर्णपणे भिजले आहे. त्यामुळे अडचणीत भर पडली आहे.
- सुभाष घायवट, सोयाबीन उत्पादक, पढेगाव.
पूर्वीच कापूस वेचणीसाठी मजूर सहज मिळत नाही. गावाबाहेरून मजूर आणून शेतीची कामे करावी लागत आहेत. अशातच शनिवारी परिसरात झालेल्या पावसामुळे झाडाला लागलेला कापूस पूर्णपणे भिजला आहे. जिल्हा प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळून दिली पाहिजे.
- नरेश झोड, कापूस उत्पादक, चिकणी.
उन्हाळ्यात जनावरांच्या वैरणीचा प्रश्न निकाली निघावा म्हणून आपण सोयाबीनच्या मळणीनंतर शेतात सोयाबीनचे कुटार ढीग करून ठेवले होते. पण शनिवारी झालेल्या पावसामुळे संपूर्ण कुटार भिजले. त्यामुळे अडचणीत भर पडली आहे. शिवाय उन्हाळ्यात जनावरांसाठीचे वैरण बाजारातूनच खरेदी करावे लागणार आहे. हिरवा चाराही सध्या सहज मिळत नाहीच.
- किशोर लुंगे, सोयाबीन उत्पादक, जामणी.