कोरियाच्या सात विद्यार्थ्यांचा सेवाग्राम आश्रमात मुक्काम
By Admin | Updated: August 18, 2015 02:18 IST2015-08-18T02:18:16+5:302015-08-18T02:18:16+5:30
शालेय अभ्यासक्रमात असलेले महात्मा गांधी यांचे विचार, रचनात्मक कार्यासह व भारतीय समाज, संस्कृती याची

कोरियाच्या सात विद्यार्थ्यांचा सेवाग्राम आश्रमात मुक्काम
सेवाग्राम : शालेय अभ्यासक्रमात असलेले महात्मा गांधी यांचे विचार, रचनात्मक कार्यासह व भारतीय समाज, संस्कृती याची माहिती घेण्याकरिता कोरिया येथील सात विद्यार्थी सेवाग्राम आश्रमात तीन दिवस मुक्कामी होते. या तीन दिवसात त्यांनी आश्रमात वास्तव्य करीत विविध विषयाची माहिती जाणून घेतली. ही माहिती जाणून घेत त्यांनी बापूंचे विचार देशाकरिता खरच प्रेरणादायी असल्याच्या प्रतिक्रीया दिल्या.
कोरिया येथील इंडेलियोन या शाळेतील चार मुलं, तीन मुली आणि एक शिक्षिका नई तालीम समिती आणि महात्मा गांधी आश्रमता मंगळवार ते गुरुवारपर्यंत मुक्कामी होते. या विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातील भारतीय समाज व्यवस्था, संस्कृती आणि गांधी विचार दर्शनाचा अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करावयाचा होता. याकरिता हे विद्यार्थी येथे आल्याचे सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांनी नई तालीम समिती, गांधी आश्रम, गांधी चित्र प्रदर्शन, एमगिरी, मगन संग्रहालय, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र, गीताई मंदिर, बौद्ध स्तूप, पवनार आश्रम आदी स्थळांना भेटी देत माहिती घेतली. नई तालीम समितीचे मंत्री प्रदीप दासगुप्ता यांच्याशी विद्यार्थ्यांनी संवाद साधताना गांधीजीचे कार्य विचार आणि रचनात्मक कार्य याची माहिती देवून जगातील मानवी जीवनात बापूचे विचार किती महत्त्वाचे आहेत, हे सांगितले.
विद्यार्थ्यांच्या दौऱ्यातील व्यवस्थापक म्हणून नागालँडचा तरूण होता. वर्धा दौऱ्याची व्यवस्था समितीचे मंत्री डॉ. शिवचरणसिंह ठाकूर, समन्वयक प्रभाकर पुसदकर आणि व्यवस्थापक पवन गणवीर यांनी सांभाळली. त्यांना गांधींच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. (वार्ताहर)