Seven arrested for murdering a girl | बिबट्याच्या हत्येप्रकरणी सात जणांना अटक

बिबट्याच्या हत्येप्रकरणी सात जणांना अटक

ठळक मुद्देवनविभागाची कारवाई : आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तालुक्यातील मांडवा शिवारात गुरुवारी सकाळी दोन ते अडीच वर्षीय बिबटाचा मृतदेह आढळून आला. बिबट्याचे पाय व मुंडके शरिरापासून वेगळे केल्याचे निदर्शनास आल्याने शिकार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. याप्रकरणी वनविभागाने तपास करुन सात आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून विविध अवयव जप्त करण्यात आले.
गोविंद केकापुरे, प्रवीण बुरघाटे, मंगल मानकर, महेश आमझरे, राहुल कासार, रमेश कासार, नरेंद्र कासार असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असल्याने वनविभागाकडून सांगण्यात आले.यासोबतच काही संशयीतांनाही ताब्यात घेतले असल्याने यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गुुरुवार १२ डिसेंबरला सकाळी बिबट्याचा मृतदेह आढळून आला. त्याचे पाय व मुंडके शरीरावेगळे असल्याचे निदर्शनास आल्याने याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला.घटनास्थळाचा पंचनामा करुन बिबट्याचे शवविच्छेदन करुन अग्नी देण्यात आला. त्यानंतर तपासचक्र गतीमान करुन प्रारंभी संशयावरुन ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हाची कबुली देताच सात जणांना अटक करण्यात आली. आरोपींकडून बिबट्याचे तीन पंजे, मुंडके, शेपूट व जननेंद्रिय जप्त केले.
ही कारवाई सहायक उपवनसंरक्षक तुषार डमढेरे, वनपरिक्षेत्राधिकारी सागर बनसोड, क्षेत्र सहाय्यक उमेश शिरपूरकर, श्याम परटके, रवी राऊत यांच्यासह मनीष कुडके, रामचंद्र तांबेकर, विनोद सोनवणे, माधव माने, धनराज मजरे, जाकीर शेख, प्रेमजीत वाघमारे, दिनेश उईके, दिनेश मसराम, वसंत खेळकर,नीलेश राऊत, चंदू कुटारे, गिरीश गायकवाड यांनी केली.

डुकराकरिता लावलेल्या फासात अडकला बिबट
मांडवा या शिवारातील बेलगाव परिसरात गोविंदा केकापुरे या शेतकºयाने शेतात रानडुकराकरिता फास लावला होता. त्या फासात डुकराऐवजी बिबट अडकला. फासात अडकलेला बिबट शेतकºयाला मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर शेतकऱ्याने परिसरातील इतर व्यक्तींच्या संगणमताने बिबट्याचे अवयव कापले, असे सांगितले जात आहे. त्यामुळे वनविभागाने या दिशेनेच तपास चक्र फिरविले असून यात आणखी बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

Web Title: Seven arrested for murdering a girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.