अत्याचाराच्या मालिका सुरूच ; अल्पवयीन युवतीचे अपहरण करून अत्याचार, गणेशनगर येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2020 19:03 IST2020-02-09T15:07:36+5:302020-02-09T19:03:24+5:30
गणेशनगर परिसरात राहणारी पीडिता शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला.

अत्याचाराच्या मालिका सुरूच ; अल्पवयीन युवतीचे अपहरण करून अत्याचार, गणेशनगर येथील घटना
वर्धा : हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याची घटना घडल्याने संपूर्ण देश हादरला; पण, अद्याप मुलींवरील अत्याचार थांबल्याचे दिसत नाही. वर्ध्यालगतच्या बोरगाव (मेघे) परिसरातील गणेशनगर येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
गणेशनगर परिसरात राहणारी पीडिता शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. पीडिता कुठेही मिळून न आल्याने पीडितेच्या कुटुंबीयाने शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती. शनिवारी युवती मिळून आल्याने पोलिसांनी तिची विचारपूस केली. गणेशनगर परिसरातीलच रहिवासी आरोपीने पळवून नेत अत्याचार केल्याची कबुली युवतीने दिल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. त्यानुसार शहर पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून शनिवारी अल्पवयीन आरोपी विरूद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याची घटना ताजी असताना दुसरीकडे वर्ध्यात घडलेली घटना घृणास्पद असून नराधमांनी कायदा व सुव्यवस्था शिंगावर घेतल्याचे दिसून येत आहे. पोलीस विभागाने अशा नराधमांवर कठोर कारवाई करण्याची गरज असून याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
युवतीच्या कुटुंबीयांनी अज्ञाताने पळवून नेल्याची तक्रार शहर पोलिसात दाखल केली होती. दुसºया दिवशी युवती मिळून आल्याने तिने तिच्यावर अत्याचार झाल्याची कबुली दिल्याने याप्रकरणात ३७६ कलम शनिवारी नोंदविण्यात आली.
प्रीती आडे, तपासी अधिकारी, वर्धा