व्हीजे प्रवर्गातील विद्यार्थिनींची शिष्यवृत्ती शासनाकडे प्रलंबित
By Admin | Updated: September 10, 2014 23:54 IST2014-09-10T23:54:49+5:302014-09-10T23:54:49+5:30
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विमुक्त भटक्यां प्रवर्गातील मुलींना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु अनेक विद्यार्थिनींची शिष्यवृती २००६ पासून शासनाकडेच प्रलंबि

व्हीजे प्रवर्गातील विद्यार्थिनींची शिष्यवृत्ती शासनाकडे प्रलंबित
वर्धा : सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विमुक्त भटक्यां प्रवर्गातील मुलींना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु अनेक विद्यार्थिनींची शिष्यवृती २००६ पासून शासनाकडेच प्रलंबित असल्याने संताप व्यक्त होत आहे. ही शिष्यवृती लवकरात लवकर देण्याची मागणी भोई समाज क्रांती दलाच्या वतीने संबंधितांना करण्यात येत आहे.
इयत्ता ५ वी ते ७ वी पर्यंत समाजकल्याण विभाग वर्धा तसेच ८ वी ते १० वी पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, वर्धा या कार्यालयामार्फत भटक्या विमुक्त जमातीतील विद्यार्थिनींना शिष्यवृती दिली जाते. परंतु २००६ पासून ५ वी ते ७ वीची १ कोटी ११ लाख ९० हजार ९२० रुपये शिष्यवृत्ती तर ७ लाख १३ हजार १०० रुपये गुणवत्ता शिष्यवृत्ती अशी एकूण १ कोटी १९ लाख ४ हजार २० रुपयांची शिष्यवृत्ती शासनाकडे प्रलंबित आहे. ८ वी ते १० वी चीही शिष्यवृत्ती शिल्लकच आहे. या शिष्यवृत्तीसाठी मुलींना बँकेत खाते उघडण्यास सांगितले. परंतु मुलींच्या बँक खात्यामध्ये शिष्यवृत्तीची रक्कम जमाच झालेली नाही. याची चौकशी करून तातडीने ही शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी भोई समाज क्रांती दलच्या वतीने करण्यात आली.
शिष्टमंडळात भोई समाज क्रांती दल शाखा, हिंगणघाटचे अध्यक्ष अशोक मोरे, सदस्य रमेश ढाले, धर्मदास गाढवे, सुभाष कोल्हे, शंकर बावणे, सुधाकर जोगे, विक्की कापटे, राजु पढाल, राजु ढाले, शुभम मोरे, रामा मोरे, लक्ष्मण कापटे, इश्वर सुरजुसे, प्रकाश सुरजुसे, प्रशांत लांडगे, शंकर मोरे, सचिन मोरे, श्रावण मोरे, उत्तम मोरे, अरूण बावणे आदींचा समावेश होता.(शहर प्रतिनिधी)