रोजगार हमी योजना विभागात कोट्यवधीचा घोटाळा ! फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे बीडीओंना दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 19:00 IST2025-11-11T18:55:38+5:302025-11-11T19:00:27+5:30
Vardha : रोजगार हमी योजना विभागात कार्यरत असलेल्या सहायक कार्यक्रम अधिकारी प्रणाली कसर यांनी अधिकाराचा गैरवापर करीत शेतकऱ्यांसह लाभार्थ्यांच्याही निधीवर डल्ला मारल्याचे समोर आले होते.

Scam worth crores in the Employment Guarantee Scheme department! BDOs ordered to register a criminal case
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : येथील पंचायत समितीच्या रोजगार हमी योजना विभागात कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचे चौकशीअंती समोर आले आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार चौकशी पूर्ण करण्यात आली. चौकशी अहवाल प्राप्त होताच या प्रकरणात दोषी असलेल्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना आर्वीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिल्यात. पण, अद्यापही याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही झाली नसल्याने यासंदर्भात कुणाचा दबाव तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रोजगार हमी योजना विभागात कार्यरत असलेल्या सहायक कार्यक्रम अधिकारी प्रणाली कसर यांनी अधिकाराचा गैरवापर करीत शेतकऱ्यांसह लाभार्थ्यांच्याही निधीवर डल्ला मारल्याचे समोर आले होते. यासंदर्भात पीरिपाचे जिल्हाध्यक्ष मेघश्याम डोंगरे यांनी रीतसर तक्रारही केली होती. प्राथमिक चौकशीअंती कसर यांच्याकडून २५ लाखांची वसुली करून त्यांना तातडीने बडतर्फ केले होते. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशान्वये चौकशी समिती गठित करून चौकशी करण्यात आली. तब्बल महिनाभर चाललेल्या चौकशीत अनेक धक्कादायक प्रकार समोर आल्याने हा घोटाळा अडीच ते तीन कोटींवर गेल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले होते. आता हा चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोषीविरोधात पोलिसांत तक्रार देण्याच्या सूचना केल्या; पण आता दोन ते तीन दिवसांचा कालावधी लोटला तरीही गुन्हा दाखल झाला नाही. यासंदर्भात पोलिस प्रशासन आणि गटविकास अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचे दिसून येत आहे.
"चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींविरोधात पोलिसांत तक्रार देण्याच्या सूचना बीडीओंना देण्यात आल्या. तक्रार दिल्यावर पोलिस पुढील कार्यवाही करतील. दोषी कोण ते कळेलच."
- अमोल भोसले, उप.मु.का.अ.जि.प.वर्धा.
"रोजगार हमी योजनेअंतर्गत अपहार प्रकरणात आर्वी पोलिस स्टेशन येथे पं.स. च्यावतीने लेखी स्वरूपात तक्रार देण्यात आली; परंतु कोर्टाच्या कामात असल्याने पोलिस स्टेशनला जाऊ शकली नाही."
- सुनीता मरसकोल्हे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, आर्वी.
"मनरेगा अपहारप्रकरणी पं.स.च्या अधिकाऱ्यांनी एक कागद दिला. त्यावरून गुन्हा दाखल करता येणे शक्य नाही. संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी बोलविले असता कोर्टात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नाही."
- सतीश डेहनकर, ठाणेदार, आर्वी.