आपल्या मुलांचं शिक्षण वाचवा
By Admin | Updated: December 1, 2014 22:58 IST2014-12-01T22:58:40+5:302014-12-01T22:58:40+5:30
खासगीकरणातून महागड्या झालेल्या शिक्षणामुळे सामान्य माणसाच्या उत्पन्नातून २५ टक्के खर्च शिक्षणावर होतो़ शिक्षण हे त्याच्या अवाक्याबाहेर होण्याची प्रक्रिया तीव्र झाली असताना सत्ताधारी

आपल्या मुलांचं शिक्षण वाचवा
शिक्षण जागर सभेचा सूर : अ़भा़ शिक्षा अधिकार मंचाची यात्रा
वर्धा : खासगीकरणातून महागड्या झालेल्या शिक्षणामुळे सामान्य माणसाच्या उत्पन्नातून २५ टक्के खर्च शिक्षणावर होतो़ शिक्षण हे त्याच्या अवाक्याबाहेर होण्याची प्रक्रिया तीव्र झाली असताना सत्ताधारी धर्मनिरपेक्ष मुल्यांना छेद देणारा विषमतापोषक अभ्यासक्रम लागू करण्यात व समायोजनाचा खेळ करण्यात गुंग आहेत. अशा स्थितीत आपल्या मुलांचं शिक्षण व भवितव्य वाचविण्यासाठी सर्वांनी आपल्यापरीने संघर्षरत होणे गरजेचे असल्याचा सूर शिक्षण जागर सभेतून उमटला.
भारतातील १०८ संघटनांच्या सहभागातून गठित अखिल भारतीय शिक्षा अधिकार मंचाद्वारे शिक्षणाचे खासगी व सांप्रदायिकीकरणाच्या विरोधात तसेच समान शाळा पद्धतीची मागणी करीत शिक्षण संघर्ष यात्रा भारतभर फिरत आहे. ही यात्रा वर्धेत आली असताना तिचे रूपांतर शिक्षण जागर सभेत झाले. प्रा. दत्तानंद इंगोले यांच्या अध्यक्षतेत घांगळे लॉन येथे झालेल्या सभेत यात्रेचे विदर्भ संयोजक रमेश बिजेकर, नुतन माळवी, राजकुमार मून, नंदकुमार धाबर्डे, अरुण हर्षबोधी, हिमांशू खोब्रागडे आदी सहभागी झाले होते. यावेळी भूमिका मांडताना बिजेकर यांनी प्राचीन ते आजच्या शिक्षण सक्तीच्या कायद्यापर्यंतचा आढावा घेत भारतीय अभ्यासक्रमांची रचना व आशय पूर्णपणे विषमतावादी असल्याचे सांगितले़ ० ते ६ वयोगट कायद्यातून वगळण्यामागील अर्थकारण स्पष्ट केले. एकट्या मुंबईत खासगी नर्सरी शाळांचा व्यवसाय हा दोन हजार कोटींचा असल्याचे ते म्हणाले.
शिक्षण वास्तव स्पष्ट करताना प्रा. मून यांनी कोठारी आयोगानुसार शिक्षण खर्च सहा टक्के असायला हवा; पण तो केवळ दोन टक्केच आहे. पहिली ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची सरासरी गळती ७० टक्के एवढी भीषण असल्याचे सांगितले. हिमांशू यांनी परदेशी व भारतीय शिक्षणातील मुलभूत फरक स्पष्ट केला. प्रारंभी शैलेश जनबंधू यांनी कविता वाचली. संचालन श्रीराम मेंढे यांनी केले तर आभार मीरा इंगोले यांनी मानले.(कार्यालय प्रतिनिधी)