तळेगाव (श्याम.पंत) : लिलाव झाले नसल्याने सध्या वर्धा नदीतून वाळू उपस्याला मनाई आहे. असे असले तरी बनावट रॉयल्टीने रेतीची अवैध वाहतूक केली जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. महसूल बुडवून चोरी करण्याची नवी शक्क्लच वाळू तस्करांनी लढविली आहे. बनावट रॉयल्टीद्वारे वाळूची वाहतूक करण्याची शक्कल ही महसूल विभागामार्फतच चोरट्यांना मिळाल्याचे बोलल्या जात आहे. वाळू तस्करीचे धागेदोरे खोलपर्यंत असल्याने लहान-सहान अधिकाऱ्यांना ती थांबविणे कठीण आहे. नदी पात्रातून वाळू उपस्याला मनाई असताना चक्क जेसीबीने वाळू उपसा होत असेल तर हा प्रकार थांबविणार कोण ? हा सवाल उपस्थित होत आहे. एकीकडे वाळू उपसा बंद असल्याचा देखावा करून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक करून महसूल बुडविण्याचा धंदा रेती तस्करांनी चालविला आहे. यात अधिकाऱ्यांचेच पाठबळ असल्याचे बोलले जात आहे. नदी पात्रातून वाळूचा उपसा करून ही वाळू वाहतूक करताना ती साठवून ठेवली जात आहे. याकरिता वाळू तस्करांनी बनावट रॉयल्टी ट्रक चालकांजवळ देण्याची शक्कल लढविली आहे. ही बनावट रॉयल्टी सोबत असली की एखाद्या अधिकाऱ्यांने वाळूची वाहतूक करताना वाहन तपासले तर ती दाखवून वाहतूक करणे सुकर होते. हा प्रकार तालुक्यात राजरोसपणे सुरू आहे. नदी नाल्यातून वाळू उपसा करून चढ्या दराने वाळू विकण्याचा प्रकार महसूल विभागाला रोखणे दुरापास्त झाले आहे. वाळू तस्कर दरदिवसाला नवनवीन क्लुप्त्या लढवून महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर ‘नहले पे दहला’ अशी खेळी करीत वाळू वाहतूक बिनधास्तपणे करीत आहेत. जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांची स्वाक्षरी व जिल्हाधिकारी कार्यालयाचा शिक्का असा रॉयल्टीत उल्लेख असणे अनिवार्य आहे. मात्र हल्ली वाळू तस्करांनी नदीपात्रातून वाळू उपसा करून ती वाहतूक करताना बनावट रॉयल्टी देण्याचा धंदा सुरू केला आहे. या अफलातून प्रकाराने वाळू तस्करीतून लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. एवढेच नव्हे तर क्षमतेपेक्षा जास्त वाळू आणक्ली जात आहे. असे असले तरी महसूल बुडावित असताना महसूल अधिकारी या बाबीकडे डोळेझाक करीत आहेत. सध्या पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत या वाळू माफियांचे देवाण-घेवाण चालत असल्याचा आरोप परिसरातील नागरिक वारंवार करीत आहे.(वार्ताहर)
बनावट रॉयल्टीद्वारे होतेय रेतीची वाहतूक
By admin | Updated: December 13, 2014 22:46 IST