वाळू चोरट्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्याची कपाशी लोळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST2019-11-29T06:00:00+5:302019-11-29T06:00:17+5:30
सोनेगाव (बाई) येथील यशोदा नदीच्या पात्रात दोन नद्यांचा संगम असल्याने मोठ्या प्रमाणात वाळूसाठा आहे. यावर वायगाव, वर्धा, देवळी, सालोड व सावंगी येथील वाळू चोरट्यांची वक्रदृष्टी पडल्याने त्यांनी पात्राला पोखरणे सुरु केले आहे. नदीपात्रातून शेतशिवारात जाणारा रस्ता पोखरण्यासोबतच पांदण रस्त्यावरुनही नदीपात्रापर्यंत जाण्याकरिता चोरटा मार्ग तयार केला आहे.

वाळू चोरट्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्याची कपाशी लोळविली
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देवळी तालुुक्यातील सोनेगाव (बाई) येथील यशोदा नदी पात्रात वाळू चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यासंदर्भात तहसील कार्यालयाकडे तक्रार करुनही योग्य कारवाई होत नसल्याने निर्ढावलेल्या वाळू चोरट्यांनी नदीपात्रालगतच्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची अडीच एकरातील कपाशी लोळवून तेथून मार्ग काढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने याची नुकसान भरपाई कोण देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सोनेगाव (बाई) येथील यशोदा नदीच्या पात्रात दोन नद्यांचा संगम असल्याने मोठ्या प्रमाणात वाळूसाठा आहे. यावर वायगाव, वर्धा, देवळी, सालोड व सावंगी येथील वाळू चोरट्यांची वक्रदृष्टी पडल्याने त्यांनी पात्राला पोखरणे सुरु केले आहे. नदीपात्रातून शेतशिवारात जाणारा रस्ता पोखरण्यासोबतच पांदण रस्त्यावरुनही नदीपात्रापर्यंत जाण्याकरिता चोरटा मार्ग तयार केला आहे. त्याकरिता शेतातील पिकांचेही नुकसान होत आहे.नदीपात्रालगत विठ्ठल इवनाथे यांचे अडीच एक शेत आहे. त्यांच्या शेतात कपाशीची लागवड केली असून या पिकातून वाळूचे वाहने नेऊन रस्ता तयार केला आहे.
त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी त्यांनी तहसील कार्यालयाकडेही तक्रार केली आहे. रात्री ११ वाजतापासून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी राहत असून सकाळी ५ वाजतापर्यंत अवैध उपसा चालतो. गावकºयांनी हटकले असता त्यांच्या अंगावर चाल करुन जातात किंवा तुम्हाला ज्यांच्याकडे तक्रार करायची ते करा,अधिकारी आमच्या खिशात असल्याच्या बाता करतात. त्यामुळे नागरिकांचाही नाईलाच आहे.
मात्र दिवसेंदिवस वाळू चोरट्यांचा त्रास वाढत असल्याने याचा तत्काळ बंदोबस्त करा अन्यथा शेतकºयांच्या होणाºया नुकसानीची भरपाई तहसील कार्यालयाने द्यावी, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.
गावकऱ्यांना अधिकाऱ्यांचा ‘नो रिस्पॉन्स’
याच वाळू घाटात वरिष्ठांच्या सूचनेनंतर देवळी तहसीलदारांनी कारवाई करीत दहा ते बारा दिवसांपूर्वी चार ट्रक व एक जेसीबी जप्त केला होता. कारवाई होताच दुसऱ्या दिवसापासून जैसे थेच अवस्था असल्याने गावकरी विचारात पडले आहे. दररोज रात्रभर अवैध उपसा चालत असल्याने नागरिक तहसील कार्यालयातील वरिष्ठांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधतात पण; प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांचीही या वाळू माफीयांना मूक संमती असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी तत्काळ दखल घेत कारवाई करण्याची मागणी होत आहे.