लॉकडाऊनमध्ये वाळूची तस्करी जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST2020-04-12T05:00:00+5:302020-04-12T05:00:25+5:30
सोरटा परिसरातील वर्धा नदीच्या या बाजूला वर्धा जिल्हा तर त्या बाजूला अमरावती जिल्हा आहे. शिवाय सध्या महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी कोरोनामुळे व्यस्त असल्याच्या संधीचे सोनेच काही वाळू माफियांकडून केले जात होते. याच गैरप्रकाराची माहिती आर्वीच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली आहे.

लॉकडाऊनमध्ये वाळूची तस्करी जोमात
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : आर्वी तालुक्यातील सोरटा येथील वर्धा नदी पात्रातून अवैध पद्धतीने उत्खनन करून वाळूची चोरी केली जात असल्याची माहिती मिळताच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून दहा ब्रास वाळू व चार तराफे जप्त केले. या धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
सोरटा परिसरातील वर्धा नदीच्या या बाजूला वर्धा जिल्हा तर त्या बाजूला अमरावती जिल्हा आहे. शिवाय सध्या महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी कोरोनामुळे व्यस्त असल्याच्या संधीचे सोनेच काही वाळू माफियांकडून केले जात होते. याच गैरप्रकाराची माहिती आर्वीच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली आहे.
आर्वी तालुक्यातील सोरटा परिसरात तराफेच्या सहाय्याने वाळू तस्करांकडून नदीपात्रातील वाळूचे उत्खनन केले जात होते. महसूल विभागाचे अधिकारी येत असल्याचे लक्षात येताच मनमर्जीने उत्खनन करणाºयांनी घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांच्या आदेशान्वये चार तराफे जेसीबीच्या साह्याने नष्ट करण्यात आले तर वाळू माफियांनी ढिग करून ठेवलेली दहा ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. विनायक नगर, सागर झाडे भास्कर कुकडे, अविनाश अजमिरे शैलेश पाझारे यांनी ही कारवाई केली.
यासंदर्भात आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर पथकाने तेथे छापा टाकला. चार तराफाचे साह्याने वाळू गोळा करणे सुरू होते. ते तराफे आम्ही नष्ट केले असून सुमारे दहा ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. हे वाळू माफिया पुलगावच्या वल्लभनगर येथील असल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले आहे. अमरावती जिल्ह्यातील अधिकाºयांनाही माहिती दिली.
-विद्यासागर चव्हाण, तहसीलदार, आर्वी.