संततधारेने बळीराजा सुखावला
By Admin | Updated: August 6, 2015 00:23 IST2015-08-06T00:23:01+5:302015-08-06T00:23:01+5:30
जिल्ह्यात अतिवृष्टी : निम्न वर्धा प्रकल्पाचे सर्व ३१ दरवाजे १० सें.मी.ने उघडले

संततधारेने बळीराजा सुखावला
वर्धा : सोमवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात सुरू झालेली पावसाची संततधार मंगळवारीही सुरूच होती. त्यामुळे जिल्ह्यातील समुद्रपूर वगळता उर्वरित सातही तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. तसेच पावसामुळे सर्वच प्रकल्पांतील जलस्तरांमध्ये चांगली वाढ झाली. निम्न वर्धा प्रकल्पाचे सर्व ३१ दरवाजे तर अप्पर वर्धा प्रकल्पाचेही काही दरवाजे उघडले आहेत. या संततधारेने शेतकरी कमालीचा सुखावला आहे.
यंदा पावसाने मारलेली दडी बळीराजाच्या काळजात चांगलीच धडकी भरविणारी होती. त्यामुळे वाढीवर आलेली पराटी व सोयाबीन ही पिके कोमेजली होती. परंतु सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली असून जलस्तरही वाढला. तसेच पावसामुळे पिकांवरील रोगांचा प्रादुर्भावही कमी होत असल्याचे शेतकरी सांगतात.
पावसामुळे सर्वत्र सुखद वातावरण असले तरी आर्वी तालुक्याला बाकळी नदीला पूर येऊन अनेक गावांना त्याचा फटका बसला. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. काही गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. या पावसामुळे आर्वी- तळेगाव -अमरावती मार्ग काही काळासाठी ठप्प झाला होता. काही भागात झाडांची पडझडही झाली. खालान भागातील शेतांमध्ये पाणी साचले. नद्यांच्या शिवारातील पिकेही पाण्याखाली गेली. मंगळवारीही पाऊस सुरूच होता. वर्धा तालुक्यातील सावंगी शिवारात पावसाने अनेक पक्षी मृत्यूमुखी पडले.(लोकमत न्यूज नेटवर्क)
वर्धा तालुक्यात अंशत: नुकसान
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने वर्धा तालुक्यातील बरबडी येथील रामदास गिरडे यांचा बैल पुरात वाहून गेला. यात त्यांचे ५० हजारांचे नुकसान झाले.
वायफड येथील कवडू महादेव डोंगरे यांच्या घराचे पूर्णत: नुकसान झाले. या व्यतिरिक्त वर्धा तालुक्यात ९८ घरांचे अंशत: नुकसान झाल्याची माहिती तहसील कार्यालयाद्वारे देण्यात आली.
आष्टी (श) १५० घरांचे अंशत: तर ३० घरांचे पूर्णत: नुकसान
आष्टी (श.) तालुक्यालाही दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा चांगलाच फटका बसला. पावसाने तालुक्यातील १५० घरांचे अंशत: तर ३० घरांचे पूर्णत: नुकसान झाले. यामध्ये साहूर ५३, आर्वी ९७ तर तळेगाव येथील ४० घरांचा समावेश आहे.
पावसामुळे बेलोरा(खूर्द) गावाजवळील वाहतूक ठप्प झाली होती. वाघाडी नाल्याला पूर आल्याने लहान आर्वी गावात पाणी शिरले. तसेच जांब नदीच्या पुराने आष्टी-साहूर मार्ग अडीच तास बंद झाला होता.
आर्वी तालुका सर्वाधित प्रभावित
आर्वी - गत ४८ तासापासून आर्वी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील बाकळी, आडनदी आणि वर्धा नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागले आहे. सततच्या पावसाने रात्री काही तासासाठी आर्वी-तळेगाव-देऊरवाडा-अमरावती मार्ग बंद झाला होता. या पावसाने आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी येथील रस्त्यावरील पूल पावसाच्या पुराने वाहून गेला तर शिरपूर गावातील बाकळी नदीचे पाणी वाढल्याने नदीकाठच्या १०० घरात पाणी शिरले. यात २० कुटुंबांना गावातील जि.प. शाळेत हलविले आहे.
बुधवारी सकाळी ८ वाजतापासून तालुक्यातील निम्न वर्धा धरणाचे सर्व ३१ दरवाजे सततच्या पावसाने उघडले आहे. यातून १० सेंटीमीटरने ९०५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रकल्पाचे पाणी सोडल्याने धनोडी परिसरातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तालुक्यातील शिरपूर गावाला बाकळी नदीचा पूर्ण वेढा पडला. गावापासून दोन कि़मी. अंतरापर्यंत सर्वत्र पाणीच असल्याने तालुक्याशी या गावाचा संपर्क तुटला.
पावसाने तालुक्यातील नांदपूर-देऊरवाडा मार्गावरील पुलावरून पाणी वात असल्याने या मार्गावरची वाहतूक रात्रीपासून पूर्ण ठप्प आहे. तालुक्यातील निंबोली (शेंडे) येथील वर्धा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. या पावसाने रात्री निंबोली गावातील दोन घरे पडली आहे. तसेच शिरपूर(बो.) येथील पूल पाण्याखाली गेला आहे.
शेतात सर्वत्र पावसाचे पाणीच पाणी असल्याने निंबोली (शेंडे) गावातील विद्युतपुरवठा रात्रीपासून पूर्णत: ठप्प होता. सततच्या पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आर्वीतील लेंडी नाला व जुना वर्धा मार्गावर पूर आला. महसूल विभागाच्या वतीने पूरग्रस्त भागाची पाहणी करणे सुरू आहे.