भरधाव कार पुलाच्या कठड्यावर धडकून उलटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2021 15:30 IST2021-11-14T14:31:54+5:302021-11-14T15:30:50+5:30
नागपूरकडून चंद्रपूरकडे जाणारी भरधाव कार अनियंत्रित होत पुलाच्या कठड्यावर धडकत उलटली. यात कारमधील डॉक्टर गंभीर जखमी झाला.

भरधाव कार पुलाच्या कठड्यावर धडकून उलटली
वर्धा : नागपूरकडून चंद्रपूरकडे जाणारी भरधाव कार अनियंत्रित होत पुलाच्या कठड्यावर धडकत उलटली. यात कारमधील डॉक्टर गंभीर जखमी झाला. हा अपघात नागपूर-चंद्रपूर मार्गावरील नंदोरी गावाजवळ शनिवारी रात्री झाला. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नागपूर येथील डॉक्टर दिलीप श्याम कांबळे हे ए.एच. ३२ ए. २९९३ क्रमांकाच्या कारने नागपूरकडून चंद्रपूरच्या दिशेने जात होते. भरधाव कार नंदोरी गावाजवळ आली असता वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच वाहन पुलाच्या कठड्यावर धडकत उलटले. यात कारमधील डॉ. दिलीप कांबळे हे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमीला वाहनाबाहेर काढण्यासाठी मदत केली. शिवाय अपघाताची माहिती पोलिसांना दिली.
माहिती मिळताच जाम महामार्ग पोलीस चौकीचे स्नेहल राऊत, किशोर येळणे, गौरव खरवडे, विनोद थाटे, सुनील श्रीनाथे, निखिल वाडकर यांनी घटनास्थळ गाठून जखमीला रुग्णालयाकडे रवाना केला. या अपघाताची नोंद समुद्रपूर पोलिसांनी घेतली आहे.