उभ्या पऱ्हाटीवर चालविला ‘रोटाव्हेटर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST2019-11-25T06:00:00+5:302019-11-25T06:00:06+5:30
सततच्या पावसासह परतीच्या पावसाने चौधरी यांच्या शेतातील कपाशीच्या पिकाचे बऱ्यापैकी नुकसान केले. केवळ २० टक्केच कपाशीची झाड शिल्लक राहिली. शिवाय कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने याची माहिती कृषी विभागासह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊनही एकही अधिकारी सदर शेतकऱ्याच्या शेतात पोहोचला नाही.

उभ्या पऱ्हाटीवर चालविला ‘रोटाव्हेटर’
विजय चौधरी।
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घा.) : सततच्या पावसासह परतीच्या पावसाने तालुक्यातील सोयाबीन आणि कपाशी उत्पादकांचे चांगलेच नुकसान केले. त्यातच गुलाबी बोंडअळीने तालुक्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकली आहे. सदर संकटांमुळे मेटाकुटीस आलेल्या बोंदरठाणा येथील शेतकरी गुलाब चौधरी यांनी कृषी विभागाच्या दुर्लक्षीत धोरणांचा निषेध करीत उभ्या पऱ्हाटीवर थेट रोटाव्हेटर चालविला. सदर प्रकारानंतरतरी कृषी विभाग जागा होईल काय, असा प्रश्न सध्या या भागातील शेतकरी उपस्थित करीत आहेत.
शेतकरी गुलाब चौधरी यांनी यंदा तीन एकरात कपाशीची लागवड केली. सुरूवातीला वेळोवेळी झालेला पाऊस अंकुरलेल्या पिकासाठी नवसंजीवणी देणाराच ठरला. शिवाय पिकाची योग्य निगा घेतल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. परंतु, नंतर झालेल्या सततच्या पावसासह परतीच्या पावसाने चौधरी यांच्या शेतातील कपाशीच्या पिकाचे बऱ्यापैकी नुकसान केले. केवळ २० टक्केच कपाशीची झाड शिल्लक राहिली. शिवाय कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने याची माहिती कृषी विभागासह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना देऊनही एकही अधिकारी सदर शेतकऱ्याच्या शेतात पोहोचला नाही. सदर परिस्थितीला कृषी विभागच दोषी असल्याचा आरोप करीत शेतकरी गुलाब चौधरी यांनी उभ्या पऱ्हाटीवर रोटाव्हेटर चालविल्याचे सांगण्यात आले.
प्रत्येक वर्षी ६५ ते ७० क्विंटल कापसाचे उत्पन्न मला होते. परंतु, यंदा लावलेला खर्चही निघणार नसल्याचे चित्र दिसत होते. किमान रबी पीक घेऊन झालेल्या नुकसानाची भरपाई काढता येईल या हेतूने उभ्या पिकावर रोटाव्हेटर चालविले. शिवाय सदर कपाशीच्या झाडाला पाहिजे तशी बोंडही येत नसल्याने हा निर्णय घेतला.
- गुलाब चौधरी, शेतकरी.