सेवानिवृत्त प्राध्यापकाने स्मशानामध्येच फुलविली शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:00 IST2021-03-13T05:00:00+5:302021-03-13T05:00:17+5:30

संजय अंबादास वानखडे असे सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. आर्वीतील संजयनगरनजीक बोहरा समाजाची सात एकर जागा आहे. त्यातील दीड एकर जागेत स्मशानभूमी असून, उर्वरित जागा पडीक होती. या सातही एकराच्या परिसराला आमदार निधीतून ताराचे कुंपण करण्यात आले. पडीक जागा उपयोगी लागावी, यासाठी संजय वानखेडे यांनी बोहरा समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. 

Retired Professor Flowering in the Cemetery | सेवानिवृत्त प्राध्यापकाने स्मशानामध्येच फुलविली शेती

सेवानिवृत्त प्राध्यापकाने स्मशानामध्येच फुलविली शेती

ठळक मुद्देपाच एकरांत घेतात उत्पादन : स्मशानभूमीतच केली राहुटी

राजेश सोळंकी
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : जेथे मृतात्म्याला अखेरचा निरोप दिला जातो, त्या भूमीवर दिवसरात्र राहायचे म्हटले, तर अंगावर काटा उभा होतो. मात्र, येथील सेवानिवृत्त प्राध्यापकाने शेतीकरिता स्मशानभूमीची जागा निवडून व तेथेच निवास करून तेथे सेंद्रिय शेती फुलविली आहे. त्यांचा हा अनोखा प्रयोग चर्चेचा विषय व अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
संजय अंबादास वानखडे असे सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. आर्वीतील संजयनगरनजीक बोहरा समाजाची सात एकर जागा आहे. त्यातील दीड एकर जागेत स्मशानभूमी असून, उर्वरित जागा पडीक होती. या सातही एकराच्या परिसराला आमदार निधीतून ताराचे कुंपण करण्यात आले. पडीक जागा उपयोगी लागावी, यासाठी संजय वानखेडे यांनी बोहरा समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. 
या जागेवर शेतीसोबतच पिकनिक स्पॉट, लहान मुलांसाठी खेळणी, बगीचा व फुलझाडे लावण्याची संकल्पना त्यांनी मांडली. बोहरा समाजाच्या प्रतिनिधींना ही संकल्पना पटल्याने वानखेडे यांनी ५५ हजार रुपयांमध्ये पाच एकर शेती ठेक्याने घेतली. 
त्यांनी ठरल्याप्रमाणे ही शेती विकसित केली. यामुळे आता येथे सर्वत्र हिरवळ पसरली आहे. हा ओसाड परिसर पिकनिक स्पॉटच झाला आहे. बोहरा समाजातील कुटुंबीय या परिसरात येऊन निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होतात. 
इतरही नागरिक विरंगुळा म्हणून या ठिकाणी वेळ घालवतात. सेवानिवृत्त प्राध्यापकाची आता स्मशानात राहणारा मनुष्य म्हणून शहरात ओळख निर्माण झाली आहे.
 

ओसाड परिसरात बहरले हिरवागार माळरान
पाण्याची अडचण असल्याने वानखेडे यांनी स्मशानभूमीतील विहिरीत सर्वप्रथम आडवे बोर केले. त्यानंतर संरक्षण भिंतीलगत लावण्यासाठी १८ हजार रुपयांची शोभेची झाडे आणली. चार लाख रुपये खर्च करून पाचही एकरांत ठिंबक सिंचनाची सोय केली. जमीन कसण्यायोग्य केल्यानंतर शेणखत, गोमुत्राचा वापर करून सेंद्रिय शेतीच केली. भुईमूग, मका, तूर व चण्याचे पीक त्यांनी घेतले. आता दोन  एकरात पपईची लागवड केली, तर उर्वरित जागेवर अद्रक, वांगी व कलिंगड लावले आहे. त्यामुळे हा परिसर आता अनेकांना खुणावत आहे.

३३ वर्षे प्राध्यापक म्हणून नोकरी केल्यानंतर आता सेवानिवृत्त झालो. शेती हा माझा पिढीजात व्यवसाय. स्मशानातील शेतीतून नफा कमाविणे हा माझा उद्देश नाहीच. येथे येणाऱ्या दु:खी माणसांचे  मन प्रसन्न व्हावे, मृतात्म्यालाही खऱ्या अर्थाने मोक्षधामाची प्रचिती व्हावी, हा प्रामाणिक प्रयत्न आहे. शेतीबरोबर एक ते दीड एकरात लहान मुलांसाठी बगीचा, खेळणे, झुला आदी विविध साहित्य लावायचे असून, येथे गार्डन डेव्हलपमेंट फार्म तयार करण्याचा मानस आहे, जेणेकरुन मुले, कुटुंब पिकनिकचा आनंद घेतील आणि स्मशानाबद्दल अंधश्रद्धा दूर होण्यास मदत होईल.
- संजय अंबादास वानखडे,           सेवानिवृत्त प्राध्यापक.

 

Web Title: Retired Professor Flowering in the Cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती