वायगाव (नि.) : आरोग्य केंद्र, क्रीडांगण व बाजार व्यवस्थेचा प्रश्न जमीन हस्तांतरणामुळे रखडला़ १५ डिसेंबरपर्यंत हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली़ याबाबत जि.प. सदस्य मीना वाळके, भारतीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रमेश वाळके, सरपंच गणेश वांदाडे, ग्रा.पं. सदस्य प्रवीण काटकर, सुनील तळवेकर, प्रमोद झाडे आदींनी जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांची भेट घेत त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले.प्राथमिक आरोग्य केंद्र १९९६ च्या बृहत आराखड्यात मंजूर झाले; पण १८ वर्षांपासून ते प्रलंबित आहे़ स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला़ यामुळे जानेवारी २०१३ मध्ये प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली़ आरोग्य केंद्रासाठी गावठाणात जागा उपलब्ध नसल्याने लगतची महसूल विभागाची जागा जि़प़ आरोग्य विभागाकडे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे़ त्रुट्या दूर करून प्रत्येक विभागाकडे पाठपुरावा केला़ ग्रा़पं़ ने २० डिसेंबर ११ ला ठराव घेत जागेची मागणी केली; पण हे प्रकरण सरकारी लालफीतशाहीत अडकले़ शासनाद्वारे महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प पुणे अंतर्गत मोठ्या गावातील बाजाराच्या सुविधा वाढविण्यासाठी वायगावची निवड करण्यात आली; पण ग्रा़पं़ कडे प्रकल्पपूरक जागा नसल्याने महसूल विभागाच्या जागेची मागणी २७ फेब्रुवारी १३ च्या ठरावाद्वारे करण्यात आली. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून पाठपुरावा केला; पण अद्याप जागेचे हस्तांतरण झाले नाही. पंचायत युवा क्रीडा अभियानांतर्गत (पायका) ग्रा़पं़ ला निधी प्राप्त झाला. क्रीडांगणासाठी पारंपरिक वापरात असलेली महसूल विभागाच्या जागेची ३१ आॅक्टोबर १२ च्या ठरावाद्वारे मागणी केली़ कागदपत्रांची पूर्तता केली; पण जागेचे हस्तांतरण झाले नाही. गाव विकासाच्या या योजना शासकीय अधिकाऱ्यांच्या दिरंगाईने रखडल्या आहे़ १५ डिसेंबरपर्यंत जागा हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी न लागल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही शिष्टमंडळाने दिला़(वार्ताहर)
जमीन हस्तांतरणाचा प्रश्न निकाली काढा
By admin | Updated: December 13, 2014 22:44 IST