खरांगण्यात पुकारला ‘भारत छोडो’ एल्गार
By Admin | Updated: August 9, 2015 02:06 IST2015-08-09T02:06:13+5:302015-08-09T02:06:13+5:30
महात्मा गांधींनी १५० वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या जुलमी इंग्रज सरकारची सत्ता उलथून टाकण्यासाठी ९ आॅगस्ट १९४२ दिनी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर ...

खरांगण्यात पुकारला ‘भारत छोडो’ एल्गार
आॅगस्ट क्रांती दिन : १९३० पासून सुरू झालेला संघर्ष ‘चले जाव’च्या आंदोलनापर्यंत सुरूच
श्यामकांत उमक खरांगणा (मो.)
महात्मा गांधींनी १५० वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या जुलमी इंग्रज सरकारची सत्ता उलथून टाकण्यासाठी ९ आॅगस्ट १९४२ दिनी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर (आॅगस्ट क्रांती मैदान) भारत छोडोचा ठराव घोषित केला. देशभरातील जनतेला ‘करो वा मरो’चा नारा दिला. त्याचे पडसाद आष्टी-चिमूर सोबतच खरांगणा परिसरातही उमटले. सर्व क्रांतीकारक पेटून उठले. मोर्चे निघाले, जमावबंदी हुकूम मोडले गेले, खेडोपाडी प्रचारक फिरविले गेले, इंग्रजी प्रशासनाने नागरिकांवर जुलूम करणे सुरू केले. परिणामी, गोटमार करून पोलिसांना हुसकावून लावण्यात आले. इंग्रजी अधिकाऱ्याने शेवटी गोळीबाराचा आदेश दिला. यात केशव बोंगीरवार हा क्रांतीकारी युवक शहीद झाला.
खरांगणा परिसराला स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी तशी १९३० च्या जंगल सत्यागृहापासूनच लाभली होती. जल, जमीन, जंगल हे आमचे आहे, त्यावर इंग्रज सरकारचा अधिकार नाही, हा संदेश घेऊन जंगलतोड, रस्ता रोको, अशी आंदोलने झाली. त्यात बापुराव गणपती उमक व इतरांना दंडासह सहा महिने कैदेची शिक्षाही झाली होती. नंतरच्या काळात म. गांधींचे मानसपुत्र जमनालाल बजाज, पवनार आश्रमचे अनंत महादेव मोघे, बाबाजी मोघे, नागपूरचे सुखा चौधरी, आर्वीचे हरिराम पुजारी, विद्या देवडीया, देवेंद्र शर्मा, गो. काळे, दांडेकर या नेत्यांनी खरांगणा गावाला भेटी दिल्या. सर्व परिसर पेटून उठला व इंग्रजाच्या बेडीतून भारतमातेस मुक्ती देण्यासाठी चळवळी सुरू झाल्या. गावातील बापूराव उमक, झामाजी महल्ले, दौलत काळे, गोविंद मुंजेवार, मारोतराव भुजाडे व इतर सहकाऱ्यांची एक चमू ज्येष्ठ क्रांतीकारी गुलाबराव काळबांडे यांच्या नेतृत्वात तयार होतीच. त्यांनी गावोगावी जाऊन स्वातंत्र्याची बिज पेरणी सुरू केली होती. भूमिगत पद्धतीने स्वातंत्र्यासाठी लोकचेतना अभियान सुरूच होते. १९४० पासूनच स्वातंत्र्याच्या आंदोलनाने जोर पकडला होता. ८ सप्टेंबर १९४० रोजी युद्ध प्रार्थना दिवस साजरा झाला होता.
१८ डिसेंबर १९४१ ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खरांगण्यास येऊन जनतेस उपदेश दिला. आपल्या भजनाच्या कार्यक्रमात ‘झाड झडूले शस्त्र बनेंगे, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे’ अशी हाक क्रांतीकारकांना देऊन स्वातंत्र्याची मशाल घराघरात पेटविली. १३ आॅगस्ट १९४२ गुरूवारी पवनार आश्रमचे अनंत महादेव मोघे यांनी शाळेच्या मैदानात भारत छोडो या म. गांधींनी इंग्रजांना दिलेल्या आदेशाच्या व ‘करो या मरो’ या आंदोलनाचा अर्थ सभेत उलगडून सांगितला. परिणामी, स्वातंत्र्य युद्धाच्या ठिणगीने पेट घेतला. याची माहिती होताच खरांगणा पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करून लाठीचार्ज सुरू केला. आंदोलनकारी संतापले व त्यांनी गोटमार करून पोलीस ताफ्यास धाम नदीपलिकडे पिटाळून लावले. त्यात ठाणेदार गुप्ता व काही पोलीस जखमी झाले. त्यांना वर्धेच्या सरकारी दवाखान्यात भरती केले गेले. त्याची परिणीती म्हणून दुसऱ्याच दिवशी १४ आॅगस्ट १९४२ ला वर्धा मॅजिस्ट्रेट कुंटे यांच्या देखरेखीत इंग्रज प्रशासनाने मिलीटरी गावात उतरविली. त्यांनी धरपकड करून मारझोड करणे सुरू केल्याने जमाव पेटला. तो आटोक्यात येत नसल्याचे पाहून गोळीबार केला. यात केशव बळीराम बोंगीरवार शहीद झाले. २२ दिवसांनी ९ सप्टेंबर १९४२ रोजी पोलिसांनी अटकसत्र सुरू केले. बापुराव उमक, झामाजी महल्ले, विश्वनाथ चौधरी यांना अटक करून जेलमध्ये डांबले. काही भूमिगत झाले. गुलाबराव काळबांडे व इतरांचा शोध घेत त्यांना बंदीस्त केले गेले. काहींना दंड आकारून सोडले तर बापुराव उमक व सहकाऱ्यांना नरसिंगपूर, नागपूर जेलमध्ये दोन वर्षांचा कारावास झाला. आष्टी-चिमूरच्या ऐतिहासिक स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होत क्रांतीविरांनी खरांगण्याचे नाव सुवर्णाक्षराने कोरले!
जंगल सत्याग्रह
खरांगण्यातील लढ्यास १९३० मध्ये जंगल सत्याग्रहाने प्रारंभ झाला. १९४० पासून स्वातंत्र्य मुक्ती आंदोलन पेटले. १९ डिसेंबर ४० रोजी जमनालाल बजाज यांनी वर्धेत सत्याग्रह केला. १८ डिसेंबर ४० रोजी मोरांगण्याच्या कलाबाई कासार यांची विहीर बजाज, काळे, मोघे यांच्या पुढाकाराने हरिजनांसाठी खुली झाली. अस्पृश्यता निवारण संदेशासह तेथे तिरंगा रोवला. १५ जानेवारी ४१ ला खरांगणा येथे मारोतराव भुजाडेंच्या नेतृत्वात सत्याग्रह तर २१ जानेवारी ४१ विद्यावती देवडीया, दांडेकर, शर्मा यांची सत्याग्रही सभा झाली. २९ व ३० रोजी गजेंद्रसिंग व काळबांडे यांनी सत्याग्रह केला. २० फेब्रुवारी ४१ झामाजी महल्ले यांच्या नेतृत्वात सत्याग्रह झाला. वणी-वरोरा येथील सत्याग्रहीसह काळबांडे व इतर क्रांतीकारी गांधींच्या आवाहनावरून दिल्लीला निघाले. ३ मार्च रोजी गोविंद मुंजेवार यांनी वाढोणा येथे सत्याग्रह केला. ३० जुलै ४१ रोजी महल्लेंच्या नेतृत्वात मांडवा येथे सभा, १८ आक्टोबर पुनमचंद रांका यांची खरांगणा येथे सभा, १८ डिसेंबरला राष्ट्रसंतानी भजनातून स्फुल्लींग चेतविले.
‘भारत छोडो’ आंदोलनाचे ‘आदी निवास’ बनले साक्षीदार
दिलीप चव्हाण ल्ल सेवाग्राम
भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात १९४२ च्या ‘भारत छोडो’ या आंदोलनाचा ठराव सेवाग्राम येथे झाले. या घटनेमुळे सेवाग्रामला महत्त्व प्राप्त झाले असून आदी निवास आंदोलनाचे साक्षीदार आहे.
१९३० मध्ये गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला. दांडी यात्रेच्या वेळी स्वराज्य मिळाल्याशिवाय साबरमती आश्रमात परतणार नाही, अशी प्रतिज्ञा बापूंनी केली. १९३४ मध्ये बापू जमनालाल बजाज यांच्या विनंतीवरून वर्धेला सेवाग्राम आश्रम आणि मगनवाडीमध्ये राहून कार्य करू लागले.
खेड्यात राहून ग्रामोन्नतीचे कार्य करायचे असल्याने गांधीजी शेगाव या खेड्यात १९३६ मध्ये आले. ते अखेरपर्यंत याच ठिकाणी आश्रमची स्थापना झाली. देशाच्या अनेक महत्त्वपूर्ण विषयाबाबत तसेच राष्ट्रीय आंदोलनांच्या संबंधित सर्व निर्णय आश्रमात होऊ लागले. गांधीजी आताच्या आदी निवासमध्ये कस्तुरबा आणि अन्य सहकाऱ्यांसोबत राहत. बापूंच्या सूचनेप्रमाणे झोपडीसाठी १०० रूपयांपेक्षा अधिक खर्च होऊ नये, स्थानिक कारागिर ७५ किमीच्या आतील साधन, साहित्याचा वापर करावा तसेच आश्रम कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन झोपडीची निर्मिती करावी. बापूंच्या सूचनेप्रमाणे झोपडी तयार झाली. १६ जुलै १९३६ मध्ये गांधीजी दौरा करून शेगावमध्ये आल्यानंतर झोपडीत राहू लागले. निवास, कार्यालय, बैठकी, चर्चा, आंदोलनाची दिशा व उपक्रम याच झोपडीव वऱ्हांड्यात होऊ लागले.
स्वातंत्र्य आंदोलन व चळवळी देशभरात सुरू होत्या. संपूर्ण देशच स्वातंत्र्यासाठी बापूंच्या नेतृत्वात संघटीत झाला होता. ब्रिटीश हादरून गेले. आदीनिवासमध्ये स्वातंत्र्य चळवळीची बैठक झाली. या बैठकीला पंडित जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, खान अब्दुल गफ्फार खॉ, कृपलानी, आर्यनायकम आदींसह देशातील प्रमुख नेते बैठकीत उपस्थित होते. चर्चा होऊन ‘भारत छोडो’चा ठराव मंजूर करण्यात आला. ९ आॅगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालिया टँक (आझाद मैदान) येथे सभा, सत्याग्रह ठरला. ब्रिटीशांनी बापू व सहकाऱ्यांना ८ आॅगस्ट रोजी मुंबईला अटक करून पुण्यात बंदी केले.
स्वातंत्र्यासाठी ‘चले जाव’, ‘करो वा मरो’ चा ठराव व नारा महत्त्वाचा ठरला आणि आदी निवास या आंदोलनाचा साक्षीदार बनला. यामुळेच तर देशभरातील आंदोलनात्मक कार्यासाठी लागणाऱ्या प्रेरणेसाठी कार्यकर्ते नतमस्तक होण्यासाठी आश्रमात येतात !