‘पुष्पा’ शोधतोय नैसर्गिक अधिवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 05:00 AM2022-03-16T05:00:00+5:302022-03-16T05:00:12+5:30

नैसर्गिक अधिवासाचा शोध घेणारा आणि पवनार ते आंजी (मोठी) असा आतापर्यंतचा प्रवास करणारा हा वाघ नेमका कोणता, तो कुठून आला आदी बाबींचा शोध वनविभाग घेत असला तरी  तरी वाघाच्या मागावर असलेले वनविभागाचे अधिकारी या रुबाबदार वाघाला ‘पुष्पा’ असेच संबोधित आहेत. एकूणच तरुण वाघ नैसर्गिक अधिवास शोधत असून त्याचा मार्गही वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी मोकळा करून देत आहेत.

‘Pushpa’ is looking for a natural habitat | ‘पुष्पा’ शोधतोय नैसर्गिक अधिवास

‘पुष्पा’ शोधतोय नैसर्गिक अधिवास

Next

महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अडीच ते तीन वर्षं वयोगटातील एक तरुण वाघ आपला नैसर्गिक अधिवास शोधत असून, सध्या तो आंजी (मोठी) शिवारात आहे. या भागात लोकवस्ती असल्याने वनविभागाचे अधिकाऱ्यांच्या तीन चमू परिसरातील ग्रामस्थांना मार्गदर्शक सूचना देत वाघाच्या प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नैसर्गिक अधिवासाचा शोध घेणारा आणि पवनार ते आंजी (मोठी) असा आतापर्यंतचा प्रवास करणारा हा वाघ नेमका कोणता, तो कुठून आला आदी बाबींचा शोध वनविभाग घेत असला तरी  तरी वाघाच्या मागावर असलेले वनविभागाचे अधिकारी या रुबाबदार वाघाला ‘पुष्पा’ असेच संबोधित आहेत. एकूणच तरुण वाघ नैसर्गिक अधिवास शोधत असून त्याचा मार्गही वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी मोकळा करून देत आहेत.

आंजी (मोठी)सह परिसरातील दहा गावांना सतर्कतेचा इशारा
-  खरांगणा (मोरांगणा) नजीकच्या ढगा जंगलाकडे जाणाऱ्या या वाघाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप जाता यावे, यासाठी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी विशेष प्रयत्न करीत आहेत. 
-  याच विशेष प्रयत्नांचा एक भाग म्हणून आंजी (मोठी)सह पेठ, नरसुला, पुलई, डोर्ली यासह परिसरातील दहा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
-   मनुष्य आणि वन्यजीव संघर्ष टाळता यावा यासाठी ग्रामस्थांनी काय करावे, तसेच काय करू नये याबाबतची माहिती वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी या गावांमध्ये जात सांगत आहेत.

नऊ कॅमेऱ्यांचा वॉच
-  नैसर्गिक अधिवास शोधत असलेल्या या तरुण वाघाच्या प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाच्या वतीने तब्बल नऊ ट्रॅप कॅमेरे ठिकठिकाणी लावले आहेत. याच ट्रॅप कॅमेऱ्यांत हा तरुण वाघ कैद झाला असून तो नेमका कुठला, याबाबतची माहिती वनविभागाचे अधिकारी वन्यजीव संरक्षण विभागाकडून जाणून घेत आहेत.

नदी-नाल्याच्या काठाने करतोय मार्गक्रमण 
-  आपला नैसर्गिक अधिवास शोधत असलेला हा तरुण वाघ मोठा रुबाबदार असून, त्याने आतापर्यंत पवनार ते आंजी (मोठी) असा सुमारे २५ किमीचा प्रवास पूर्ण केला आहे. या प्रवासादरम्यान त्याने कुठल्याही मनुष्याला इजा पोहोचविलेली नाही. तो नदी आणि नाल्याच्या काठा-काठानेच आपला पुढील प्रवास करीत आहे.

अडीच ते तीन वर्षं वयोगटातील एक तरुण वाघ सध्या आपला नैसर्गिक अधिवास शोधत आहे. या वाघाच्या प्रत्येक हालचालींवर वनविभागाचे बारकाईने वॉच असून नऊ ट्रॅप कॅमेरेही आवश्यक ठिकाणी लावण्यात आले आहेत. शिवाय तीन चमू या वाघावर लक्ष ठेवून आहेत. कुठलाही अनुचित प्रकार न घडता तरुण वाघ आपल्या नैसर्गिक अधिवासात जावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
- रुपेश खेडकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, वर्धा.

 

Web Title: ‘Pushpa’ is looking for a natural habitat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ