सार्वजनिक विहीर, रस्त्यावर स्लॅब टाकून केले अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 22:18 IST2019-06-22T22:17:18+5:302019-06-22T22:18:12+5:30
भीषण पाणीटंचाई असताना सार्वजनिक विहिरीसोबतच रस्त्यावर बांधकाम करून अतिक्रमण करण्याचा प्रकार शहरालगतच्या बोरगाव (मेघे) येथे उजेडात आला. याविषयी प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सार्वजनिक विहीर, रस्त्यावर स्लॅब टाकून केले अतिक्रमण
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भीषण पाणीटंचाई असताना सार्वजनिक विहिरीसोबतच रस्त्यावर बांधकाम करून अतिक्रमण करण्याचा प्रकार शहरालगतच्या बोरगाव (मेघे) येथे उजेडात आला. याविषयी प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
बोरगाव येथे प्रमोद रामदास रामटेके यांना रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले. मंजुरीपूर्वी ग्रामपंचायतीकडून कुठलीही शहानिशा करण्यात आली नाही. घरकुलधारकाने सुमारे शंभर वर्षांपासून यामुळे वहिवाट असलेल्या सहा फूट रुंद रस्त्यावर अतिक्रमण करून अवैधरीत्या बांधकाम केले. एवढ्यावरच ते थांबले नाही तर पाणीपुरवठ्याच्या सार्वजनिक विहिरीवर स्लॅब टाकून नागरिकांचे पाणी भरणे बंद केले. याबाबत परिसरातील नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून जिलधिकाऱ्यांनी संबंधितांना चौकशीचे निर्देश दिले. लोकसेवकांना घटनास्थळी उपस्थित राहण्याबाबत नोटीसही दिली. मात्र, चौकशीचे काय झाले, हे कुणालाही समजले नाही. सद्यस्थितीत प्रकरण थंडबस्त्यात आहे. विहिरीवर अतिक्रमण करण्यात आल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अतिक्रमणकर्त्याला प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप केला जात आहे. ग्रामस्थांनी निवेदनातून रस्ता आणि विहीर अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी केली. दुसरीकडे अतिक्रमणधारक ग्रामपंचायत व पंचायत समिती कार्यालयातून बांधकामाचा धनादेश घेण्यासाठी खटाटोप करीत आहे. न्याय मिळवून देण्याची नागरिकांची मागणी आहे.