सर्पदंशाने मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना आर्थिक मदत द्या
By Admin | Updated: August 3, 2015 01:53 IST2015-08-03T01:53:56+5:302015-08-03T01:53:56+5:30
साप हा प्राणी वन्यजीव प्रकारात मोडतो. त्यामुळे सापाचा वन्यजीव संरक्षण यादीत समावेश केला आहे.

सर्पदंशाने मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना आर्थिक मदत द्या
मागणी : प्रशासनाला निवेदनातून साकडे
वर्धा : साप हा प्राणी वन्यजीव प्रकारात मोडतो. त्यामुळे सापाचा वन्यजीव संरक्षण यादीत समावेश केला आहे. या यादीत समावेश असलेल्या कोणत्याही प्राण्याच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याला आठ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. मात्र साप चावून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जात नाही. याबाबत त्वरित निर्णय घेऊन तरतूद करावी, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सलील यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी विदर्भ सर्प मित्र मंडळाचे गजेंद्र सुरकार व शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. तसेच याबाबत भूमिका समजावून सांगताना चर्चा केली. जिल्हाधिकारी यांनी याबाबत पालकमंत्री व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्र शासनाने वन्यजीवाच्या हल्ल्यात मृत्यू पावणाऱ्यांच्या कुटूंबास वन विभागातर्फे आठ लाख रूपयांपर्यंत मदत दिले जाईल असे जाहीर केले आहे. याबबात जनजागरण करण्यात येत आहे. सर्पमित्र मंडळाच्या वतीने या मागणीकरिता पाठपुरावा करण्यात आला. मात्र सरकारी पातळीवर, चालू अधिवेशनात वरील विषयावर निर्णय घेवून गरीब शेतमजूर, शेतकरी यांना दिलासा दिला गेला नाही. सर्पदंशाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना अन्य वन्यजीवांप्रमाणे असलेल्या तरतुदीत मदत मिळावी म्हणून या निवेदनातून ही मागणी करण्यात आली.
यावेळी शिष्टमंडळात श्रेया गोडे, मंगेश शेंडे, मयुर राऊत, सुनिल सावध, रविशंकर बाराहाते, पंकज सत्यकार, नीरज गुजर, सुधीर पांगूळ, राजेंद्र कळसाईत, राजेश रोडे, सुहास थुल, मनोज तायडे, प्रफुल्ल ठोंबरे, कांबळे, सारिका डेहनकर, पूजा जाधव, भरत कोकावार, अनिल मुरडीव, राजेंद्र ढोबळे, अॅड. कपिल गोडघाटे, निशांत जगताप, सुधाकर मिसाळ आदींचा सहभाग होता.(स्थानिक प्रतिनिधी)