संरक्षण आणि संवर्धनामुळे बोरव्याघ्र प्रकल्प उत्कृष्ट
By Admin | Updated: August 17, 2015 02:14 IST2015-08-17T02:14:26+5:302015-08-17T02:14:26+5:30
देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प असूनही एकाच ठिकाणी वाघासह अनेक वन्यप्राणी, पक्षी आणि निसर्ग पाहण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध होत ..

संरक्षण आणि संवर्धनामुळे बोरव्याघ्र प्रकल्प उत्कृष्ट
बोर व्याघ्र प्रकल्पाचा पहिला स्थापना दिवस : १० वाघांच्या वास्तव्यामुळे संपूर्ण जगात नावलौकिक
वर्धा : देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प असूनही एकाच ठिकाणी वाघासह अनेक वन्यप्राणी, पक्षी आणि निसर्ग पाहण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध होत असल्यामुळे बोर व्याघ्र प्रकल्प देशात सर्वोत्कृष्ट व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखल्या जात असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले
सेलू येथील विद्यादीप सभागृहात बोर व्याघ्र प्रकल्पाचा पहिला स्थापना दिवस रविवारी साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य वन सरंक्षक एम.एस. रेड्डी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ गोपाळराव ठोसर, बीएचएनएसचे सहायक संचालक संजय करकरे, विभागीय वनअधिकारी बी.एस. भलावी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. बोर व्याघ्र प्रकल्प अत्यंत समृद्ध असून येथील वाघासह इतर प्राणी व जंगलाचे सौदर्य बघण्यासाठी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगताना जिल्हाधिकारी सलील म्हणाले की, नागपूर येथून केवळ एक तासात पर्र्यटक व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊ शकतात. त्यामुळे चंद्रपूरसह इतर व्याघ्र प्रकल्पापेक्षा अधिक क्षमता येथे आहे. येथे वाघ टावर, सायकलद्वारे जंगल भ्रमण, निसर्ग पर्यटन केंद्र आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
पक्षीतज्ज्ञ ठोसर यांनी सरंक्षण आणि संवर्धनासोबत लोकांच्या सहभागामुळे बोर व्याघ्र प्रकल्प भारतातील सर्वांत सुंदर प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या विकासात येथील जनतेचा सहभाग आहे. गावांचे जंगलावरील अवलंबन कमी करण्यासाठी उपाययोजना करा असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात मुख्य वन सरंक्षक एम.एस. रेड्डी यांनी बोर व्याघ्र प्रकल्प हा देशातील सर्वात लहान प्रकल्प असून मेळघाट पेंच व ताडोबा यांना जोडणारा बोर व्याघ्र प्रकल्प हा महत्त्वपूर्ण आहे. वन्यप्राण्यांसाठी सरंक्षण व संवर्धनामुळे वाघांची व इतर वन्य प्राण्यांची संख्या वाढत आहे. जनतेच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प देशातील सर्वांत महत्वाचा वन्यप्राण्यांचे संवर्धन व विकास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी व्याघ्र प्रकल्पासदंर्भातील प्रदर्शन आयोजित होते. त्याचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. ग्राम विकास समितीच्या सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वाघ माझा सोबती तसेच विविध स्पर्धातील विजेत्यांना गौरविण्यात आले.(प्रतिनिधी)