शेतकऱ्यांसाठी नव्या कृषी रोजगार योजनेचा लोकसभेत प्रस्ताव
By Admin | Updated: August 7, 2015 02:06 IST2015-08-07T02:06:06+5:302015-08-07T02:06:06+5:30
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसारखीच शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी रोजगार योजना सुरू करण्यात यावी, ...

शेतकऱ्यांसाठी नव्या कृषी रोजगार योजनेचा लोकसभेत प्रस्ताव
वर्धा : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसारखीच शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी रोजगार योजना सुरू करण्यात यावी, असा प्रस्तावच वर्धेचे खासदार रामदास तडस यांनी बुधवारी लोकसभेपुढे शून्य काळात ठेवला. यावेळी विदर्भातील शेतकऱ्यांच्या व्यथांकडेही लक्ष वेधले.
महाराष्ट्रात निसर्गाच्या अनियमिततेमुळे दुष्काळ निर्माण होण्याची स्थिती आहे. मागील दहा वर्षांपासून अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न बिकट झालेला आहे. अशाही स्थितीत बियाणे, खत यांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. मे-जून महिन्यात पेरणी केल्यानंतर जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना उत्पन्न निघण्याची वाट पहावी लागते, परंतु नैसर्गिक संकट आले तर, शेतकऱ्यांनी लावलेला खर्च निघणेसुद्धा कठिण जाते. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे, याकडेही खा. तडस यांनी लक्ष वेधले.
शून्य प्रहरात खा. तडस यांनी हा प्रश्न उपस्थित करताना शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी सरकारने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसारखीच कृषी रोजगार योजना अंमलात आणली, तर शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल, याकडे लक्ष वेधले. ही योजना केंद्र शासनाने राबविल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सोबतच उत्पन्नाचा लाभ मिळेल, परंतु अशी कोणतीही योजना नसल्यामुळे ४० टक्के शेतकरी घेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकत नाही. फक्त शेतकऱ्यांचे २० टक्के पुनर्गठण झालेले आहे. ही कृषी रोजगार योजना सुरु केल्यास आत्महत्याग्रस्त विदर्भातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल, ही बाबही खा. तडस यांनी पटवून दिली.(जिल्हा प्रतिनिधी)